आता बोला.. सरकारने नियुक्त केलेली समितीच वादात! दिननाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचे मृत्यू प्रकरण
Pune News Dinnath Mangeshkar Hospital woman death case : दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यादरम्यान, रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आणि रुग्णालयाने या आरोपाची दखलही घेतली. या प्रकरणात चौकशीसाठी शासनाने पाच सदस्यीय समितीची नेमणूक केली. ही समिती आज 7 एप्रिल रोजी आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे.
सरकारकडे अहवाल सादर करण्यापुर्वी समिती वादात सापडली आहे. या समितीतील एका सदस्यावर गैरव्यवहाराचे आरोप असल्याचे पत्रच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे.

कुणी पाठवले पत्र?
पुण्यातील मनसेचे राम बोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या वैद्यकीय समितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण पवार यांना चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून हटवावे अशी मागणी या पत्राद्वारे राम बोरकर यांनी केली आहे. आता ही मागणी का केली हेही पत्रात नमूद आहे.यासंदर्भातील वृत्त सकाळने दिले आहे.
काय आहे पत्रात?
राम बोरकर यांच्या पत्रानुसार, डॉ. पवार यांच्या शासकीय कामकाजातील अनियमितता व गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी असून त्या विरोधात विधानसभेत आरोप करण्यात आले आहेत असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या विषयावर लक्षवेधी घेऊन चर्चा करण्यात आली मात्र त्यावर गांभीर्याने कारवाई झाली नाही हेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, हा वादाचा मुद्दा असतानाच अशा अधिकाऱ्यांकडे एवढ्या गंभीर प्रकरणाची चौकशी करतानाच समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणे योग्य आहे का असा बोरकर यांनी सवाल केला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचाही आक्षेप
प्राप्त माहितीनुसार, शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण पवार यांच्यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनीही आक्षेप घेतला आहे. डॉ. पवार यांच्यावर काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहाराच्या तक्रारी केल्या आहेत. त्या व्यक्तीला चौकशी समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याने निष्पक्ष चौकशीबाबत शंका उपस्थित होत असल्याचेही मोरे यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications