मोठी बातमी ! तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर घडला अनर्थ; पुण्याचे पाच पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू
मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्र किनार्यावर आज मोठी दुर्घटना घडली. पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील पाच पर्यटक आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. पाचपैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले. त्यांना परत किनाऱ्यावर न येता आल्याने त्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिकांनी एका पर्यटकाला वाचवले आहे. मात्र, दोघांचा मृत्यू झालाय.

कशी घडली दुर्घटना
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पुण्यातील काही पर्यटक तारकर्ली समुद्र किनार्यावर अंघोळीसाठी आले होते. त्याच दरम्यान पाच पर्यटकांपैकी तीन पर्यटक अंघोळीसाठी खोल समुद्रात गेले होते. स्थानिकांनी त्यांना खोल समुद्रात जाऊ नये, असे सांगितले होते. तरी देखील हे पर्यटक खोल समुद्रात आंघोळीसाठी गेले. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाले. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यापैकी दोघे बुडाले व त्यांचा मृत्यू झाला.
एक वाचला, दोघांचा मृत्यू
खोल समुद्रात गेलेले तिघे पर्यटक पाण्यात बुडाले. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. तीनपैकी एका पर्यटकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. परंतु दोघांचा बुडून मृत्यू झाला. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या अपघातात ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे.
वारंवार घडतात दुर्घटना
या समुद्र किनार्यावर वारंवार अशा दुर्घटना घडत असतात. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले आहेत. खोल समुद्रात जाऊ नये, असे स्थानिकांनी सांगून देखील पर्यटक खोल समुद्रात गेल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.












Click it and Unblock the Notifications