मोठी बातमी : पार्थ पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा?, परंतु 2 की 6 वर्षांचा पेच प्रसंग,नेमकं काय ठरलं
Parth Pawar NCP News : महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या मोठी उलथापालथ होऊ लागली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठे फेरबदल झाले आहेत. त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. अजित पवारांची पोकळी भरून काढण्यासाठी आता पवार घराण्यातील पुढील पिढीवर जबाबदारी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे.

सुनेत्रा पवारांचा शपथविधी; राज्यसभेची रिक्त जागा
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. ३१ जानेवारी रोजी त्यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला. सुनेत्रा पवार या त्याआधी राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. हीच जागा आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि विशेषतः पवार कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या रिक्त जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन की सहा वर्षांची टर्म? पार्थ पवारांसाठी मोठा विचार
महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेची मुदत ४ जुलै २०२८ पर्यंत म्हणजेच अजून दोन वर्षे शिल्लक होती. मात्र, ही अर्धवट टर्म पार्थ पवारांना देण्याऐवजी त्यांना पूर्ण सहा वर्षांची राज्यसभा टर्म असलेल्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे पार्थ पवारांना राष्ट्रीय राजकारणात दीर्घकाळासाठी स्थिर स्थान मिळू शकते. लवकरच राज्यसभेची ही जागा भरली जाणार असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केल्याचेही समजते.
अजित दादा नंतर पुढील पिढीवर जबाबदारी
अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. यापूर्वी बारामती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून, पवार कुटुंबातील पुढील पिढीवर थेट मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.
एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील कारभार सांभाळतील, तर दुसरीकडे जय पवार दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. याच अनुषंगाने पक्षाच्या बैठकीत पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.
पार्थ पवारांचा मागील राजकीय प्रवास!
पार्थ पवार यांनी याआधी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तरीही त्या निवडणुकीमुळे पार्थ पवार राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा मजबूत राजकीय पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मंगळवारी नियोजित असलेला दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते दिल्लीला जाणार होते. मात्र, त्याआधी बारामतीहून मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरातील त्या स्थळाला भेट दिली, जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तेथे त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या नियोजित स्मृतीस्थळाबाबत चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले, मात्र पुढे दिल्ली दौरा रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.












Click it and Unblock the Notifications