महाराष्ट्रात पाऊस'कारण', विरोधक सत्ताधाऱ्यांवर बरसले
मुंबई: मुंबईत मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या पाच तासांत मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विविध सखल भागात पाणी साचल्याने मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र आहे.
यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली असून सोशल मीडियावर नाराजी उमटल्याचे दिसत आहे. आता अशातच पाऊसकारण सुरु झाल्याने ऐन पावसात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे
मुंबईतील अवस्थेवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुंबईत पाऊस येणं हे अचानक नसतं. यातून पावसाळ्यापूर्वी काम झालेलं नाही हे सिद्ध होत आहे.
आदित्य ठाकरे जोपर्यंत होते, तोपर्यंत मुंबईत बारकाईने लक्ष देत होते. मात्र आता मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली आहे. मुंबईतील कार अपघातावरुनही दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा हा मद्यपान करून महिलेला घडक देतो, फरफटत नेतो. सर्वसामान्य माणसाचा जीव कसा घेता येतो,याचं हे उत्तम उदाहरण आहे. मुख्यमंत्री भल्याभल्यांची विकेट घेतात, मात्र एवढी यंत्रणा असून आरोपीला पकडू शकले नाहीत, असा घाणाघातही दानवेंनी केला.
वडेट्टीवारांनीही साधला निशाणा
विजय वडेट्टीवार यांनी सरकारला व्यवस्थापन जमत नाही, असं म्हणत या सरकारची ओळख अपयशी सरकार झाली असल्याची टिका केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईच्या तिजोरीची लुट करणाऱ्या आणि डाका टाकणाऱ्यांमुळे ही परिस्थिती आहे.
300 मिमीमध्ये अशी परिस्थिती होत असेल तर काय? अनेक कामं राहिली होती.
त्यांना कामे करता आली नाहीत. टक्केवारी आणि कमिशनखोरीत सरकार अडकलंय. मुंबईच्या अवस्थेला पालिका आणि सरकार जबाबदार आहे. सरकारच्या परतीचा प्रवास आता सुरु झालाय. सरकारला व्यवस्थापन जमत नाही.
वडेट्टीवार म्हणाले, अपयशी सरकार
मुंबईच्या पावसाचा फटका सामान्य नागरिकांसह आमदार आणि मंत्र्यांनाही बसला आहे. राज्याचे मदत आणि आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील मुंबईच्या पावसाचा फटका बसला.
यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय होणार? हे सरकार काहीच करु शकत नाही. अपयशी सरकार अशी ओळख निर्माण झाली असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications