त्यांना चर्चेत राहायला आवडतं म्हणून शरद पवारांच नाव घेतात' - जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. त्यांना चर्चेत राहायला आवडतं म्हणून शरद पवारांच राज ठाकरे नाव घेतात असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.
आज पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. यासह त्यांनी विविध मुद्द्यावर आपले मत मांडले.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप करतात. पण त्यांच्या मनात जातीद्वेष आणि धर्मद्वेष किती आहे, हे त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे जातीपातीच्या राजकारणाबाबत राज ठाकरे यांनी बोलू नये अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
लोणावळ्याला जाऊन का राहतात?
6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी असते तेव्हा राज ठाकरे शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्याला जाऊन का राहतात? हे कोणाला माहिती नाही, हे जगाला सांगावे लागेल असा टोलाही टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यांनी लगावला.
एसीच्या घरात जन्मलेल्याला आरक्षण काय कळणार
महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणतात, आरक्षण कशासाठी आहे, हे समजून घ्यावे लागते. एअर कंडिशनच्या घरात जन्म झालेल्यांना आरक्षणाचे महत्त्व काय कळणार असा टोलाही त्यांनी लगावला.
आरक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते. याचा अनुभव असावा लागतो. ज्यांच्या हाताची पाचही बोटं तुपात आहेत आणि डोके कढईत त्यांना काय आरक्षण कळणार.जातीनुसार जणगणना होऊ जाऊ दे, बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला कळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती काय आज ते कळेल. आर्थिक दुर्बल असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
राजकारणात त्यांचं अस्तित्व संपलं
राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत राहायला आवडते. चर्चेत राहाचे असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचं अस्तित्व संपलं आहे. शरद पवार यांनी काय करावं त्यापेक्षा राज ठाकरे यांनी काय करावं, कितीवेळा त्यांनी भूमिका बदलली, याचा त्यांनीच विचार करावा. राज ठाकरे यांनी शरद पवार यांना उपदेश करायला जाऊ नये, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
पवार जातीपातीचे राजकारण करत नाहीत
शरद पवार यांनी कुठल्या कुठल्या समाजासाठी काम केले,हे मी या क्षणी सांगण्याची गरज नाही. त्या त्या समाजाला याबद्दल व्यवस्थित माहिती आहे. शरद पवारांनी आपल्यासाठी काय केले? मग ते धनगर असो आदिवासी असो की शेड्युल कास्ट असो .. भारतात मंडल आयोग आणण्याची हिंमत नव्हती. ओबीसी आरक्षण देण्याचं काम शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले. त्यामुळे साहेब जातीपातीचं राजकारण करत आहेत, असे सांगू नये, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
राज ठाकरेंचे जातीपातीवर बोलणे हास्यास्पद
राज ठाकरे यांनी सोलापूरमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांना लक्ष्य केले होते. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणाबाबत बोलू नये. त्यांनी परप्रांतीय मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतली. अशा माणसाने जातीपातीबद्दल बोलावे आणि ते पण शरद पवार यांच्याबद्दल, हे हास्यास्पद आहे आणि त्यांना हास्यविनोद करण्याची सवय आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.












Click it and Unblock the Notifications