नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी गोंधळ! गिरीश महाजनांनी डॉ. आंबेडकरांचा अवमान केला; नेमका वाद काय?
Nashik Republic Day controversy Girish Mahajan : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह नाशिकमध्ये साजरा होत असताना एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने एका सरकारी महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांना जाब विचारला. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता, ज्यावर आता गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमकं प्रकरण काय?
नाशिकमध्ये आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाप्रसंगी मंत्री गिरीश महाजन भाषण करत होते. यावेळी त्यांनी भाषणात विविध महापुरुषांचा उल्लेख केला, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्यांच्याकडून राहून गेले. याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी उभे राहून संताप व्यक्त केला.
"ज्यांनी संविधान दिले, ज्यांच्यामुळे हा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय, त्या बाबासाहेबांचे नाव भाषणात का नाही?" असा सवाल त्यांनी भर कार्यक्रमात उपस्थित केला. यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला आणि पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून माधवी जाधव यांना ताब्यात घेतले.
प्रजासत्ताक दिनीच बाबासाहेबांच्या नावाचा विसर मंत्र्यांना पडत असेल तर याहून मोठे दुर्देव काय असू शकते ? भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अमुल्य असून एखाद्या मंत्र्याच्या भाषणातील अनुल्लेखाने बाबासाहेबांचे योगदान पुसता येणारे नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 26, 2026
असो… pic.twitter.com/fJdSrGnu3y
"सस्पेंड केलं तरी चालेल, पण तत्त्वांशी तडजोड नाही" - माधवी जाधव
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरही माधवी जाधव आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी भाषणात बाबासाहेबांचे नाव येईल याची शेवटपर्यंत वाट पाहत होते. पण ज्या व्यक्तीमुळे आपण लोकशाहीत श्वास घेतोय, त्यांचेच नाव डावलले गेले. मंत्र्यांची ही मोठी चूक आहे. मला सस्पेंड केले तरी चालेल, मी वाळूच्या गाड्या उतरेन किंवा मातीकाम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मी माफी मागणार नाही, उलट मंत्र्यांनी आपली चूक मान्य करावी."
गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण आणि दिलगिरी
या वादावर पडदा टाकण्यासाठी गिरीश महाजन यांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "माझ्याकडून अनावधानाने नाव राहिले असावे, त्यामागे कोणताही हेतू नव्हता. मी नेहमीच भाषणात सर्व महापुरुषांचा आदर करतो.
मी भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या, मात्र बाबासाहेबांचे नाव राहून गेले असेल तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मुद्दाम कोणाचेही नाव डावलण्याचा प्रश्नच येत नाही."
प्रशासकीय वर्तुळात चर्चा
एका सरकारी महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांना अशा प्रकारे जाब विचारल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संविधानाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांवरून सोशल मीडियावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.












Click it and Unblock the Notifications