अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर!
नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू 'कॅप्टन' अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून सुरू झालेले हे सत्र आता एका मोठ्या गुन्हेगारी साखळीच्या उलगड्यापर्यंत पोहोचले असून, या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक आता या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढत आहे.

पुरावे गोळा करण्यावर एसआयटीचा भर
तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एसआयटीने तांत्रिक पुराव्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अशोक खरातच्या निवासस्थानासह त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेले लॅपटॉप, संगणक, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेजचे कसून विश्लेषण केले जात आहे. खरातच्या मोबाईल संभाषणाचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, यातून त्याचे इतर कोणाशी संबंध होते आणि त्याने किती महिलांना आपल्या जाळ्यात ओढले, याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खरातविरुद्ध दाखल असलेल्या जुन्या तक्रारींचीही पुन्हा एकदा पडताळणी केली जात आहे.
नीरज जाधवच्या अटकेने तपासाला वेग
या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाची घडामोडी म्हणजे नीरज जाधव याला पोलिसांनी घेतलेली ताब्यात. खरातच्या केबिनमधील आक्षेपार्ह सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यात नीरजचा हात असल्याचा संशय आहे. शिर्डीमध्ये एका पीडित मुलीला मॉर्फ केलेले फोटो पाठवून तिला धमकावल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. नाशिक गुन्हे शाखेकडून आता नीरजची कसून चौकशी केली जात असून, त्याच्याकडे असलेल्या माहितीमुळे खरातच्या साम्राज्यातील अनेक धक्कादायक गुपिते उघड होण्याची चिन्हे आहेत.
तक्रारदारांची वाढती संख्या आणि पुढील दिशा
सुरुवातीला केवळ एक महिला समोर आली असताना, आता आणखी तीन पीडित महिलांनी धैर्याने पुढे येत खरातवर लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केले आहेत. एसआयटीला संशय आहे की, खरातने 'आध्यात्मिक उपचारांच्या' नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केली असावी. केवळ लैंगिक अत्याचारच नव्हे, तर खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचे जाळेही त्याने विणले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. सर्व उपलब्ध माहिती आणि पुराव्यांचे संकलन पूर्ण झाल्यानंतर एसआयटी आपला सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार आहे, ज्यानंतर या भोंदूबाबावर आणखी कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.












Click it and Unblock the Notifications