जरांगेंच्या आंदोलनाचे बोलवते धनी दुसरेच; 'या' नेत्याचा विरोधकांवर निशाणा, फडणवीसांचे केले कौतुक
Narendra Patil on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल द्वेषपूर्ण विधान करत आहेत. त्यावर आता मराठा नेते तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व भाजपा नेते अशी ओळख असलेले नरेंद्र पाटील यांनी थेट भाष्य केले. जरांगे यांच्या आंदोलनामागील सूत्रधार हे सत्ताबाहेरील आहेत. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुळात जरांगे यांच्या मनातील गैरसमज दूर झाले तर ते फडणवीसांना मानतील, फडणवीसांनी मराठा समाजाला सातत्याने न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असा दावा देखील नरेंद्र पाटील यांनी केला.

नरेंद्र पाटील पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला एसईबीसीमधून 12 टक्के आरक्षण मिळाले. मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तसेच सारथी सारखी संस्था काढली. या दोन्हींमधून मराठा समाजातील युवकांना फायदा झाला आहे. फडणवीसांनी एवढे चांगले काम करून देखील मनोज जरांगे त्यांच्याबद्दल द्वेष व्यक्त करत असतील, तर त्यामागे कोणी बोलावता धनी असला पाहिजे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनामागे सत्तेबाहेरील सूत्रधार
नरेंद्र पाटील म्हणाले की, जे सत्तेत नाहीत ते मनोज जरांगेच्या आंदोलनामागचे सूत्रधार असू शकतो. मग ते कुणीही असू शकतात. काही अतृप्त आत्मा असतील ज्यांना मराठा समाजाचे प्रश्न झुलवत ठेवायचे असतील. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी भापज-शिवसेना सत्तेवर होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विराधी पक्षात होते. मात्र, सध्या एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत तर विरोधी पक्षात ठाकरेंचा गट आहे तो असू शकतो. अजित पवार सत्तेत आहेत तर शरद पवारांचा गट त्यामागे असू शकतो, असे म्हणत नरेंद्र पाटील यांनी विरोधकांकडे बोट दाखवले आहे.
...तर देवेंद्रजींबाबतचा गैरसमज दूर होईल
नरेंद्र पाटील म्हणाले की, मनोज जरांगे हे आंदोलनाच्या आधी महामंडळाबाबतच्या कामासाठी मला भेटायचे.त्यांची कामेही आम्ही करत होतो. ते नेहमी सामान्य कार्यकर्ता म्हणून न्याय मिळवण्यासाठी काम करत होते. आता त्यांच्या आंदोलनाचे चळवळीत रुपांतर झाले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे वेगळेपण दाखवले. आता आगामी विधासभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार उभे करणार असे ते म्हणत आहेत. मात्र कुणाच्या विरोधात उभे करणार याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. या सगळ्यामागे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले जात आहे. यामागे असणारे सूत्रधार मनोज जरांगेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या मनातील फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर होईल, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.












Click it and Unblock the Notifications