शरद पवारांना पद्मविभूषण देता अन् दुसरीकडे भ्रष्टाचाराचा सरदार म्हणता! या नेत्याचा अमित शहांना टोला
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपच्या राज्य मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हटले. केंद्रातील भाजप सरकारनेच 2017 साली शरद पवार यांनी पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि आता त्यांना शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार कसे वाटू लागले. देशात भ्रष्टाचाराचा सरदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
आमच्या सरकारने आरक्षण दिले होते
राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही म्हणून ते आरक्षण गेले असे नाना पटोले म्हणाले.

आमची भूमिका स्पष्ट, तुम्ही निर्णय घ्या
नाना पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे महायुतीचे नेते व मंत्री म्हणत आहेत पण याआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे. विरोधी पक्षांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केलेली आहे. आता निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची आहे पण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकारचे असताना आरक्षण देण्यापासून महायुती सरकारला कोणी अडवले? असा सवाल त्यांनी विचारला.
विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत..
नाना पटोले यांनी आरोप केला की, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय व गडाच्याखाली असलेल्या गजापूर गावातील दंगल ही सरकार पुरस्कृत होती.20 जून 2024 रोजी स्वराज्याची राजधानी रायगडावरील सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातच, विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम, करतो असे म्हटले होते. त्यानंतर १४ जुलै रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवून आणल्या. स्थानिकांनी ५ जुलै रोजीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अशी घटना घडू शकते असे सांगितले होते. १२ जुलै रोजी अर्जही दिला होता तरीही शासन वा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, हे विशेष असेही नाना पटोले यांनी सांगितले.
काय म्हणाले होते अमित शहा?
अमित शहा म्हणाले, सर्वात मोठे भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. ते आमच्यावर काय आरोप करतात, या देशात भ्रष्टाचाराला संस्थागत करण्याचे काम जर कुणी केले तर ते शरद पवारांनी केले. आमच्यावर ते भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत. यावेळी शरद पवार तुमच्या खोटेपणाला माझे कार्यकर्ते जाणून आहेत.
खोटे नॅरेटीव्ह पसरवून विरोधक निवडणूक जिंकू पाहत आहे. भ्रष्टाचाराची ते गोष्ट करीत आहेत. शरद पवारांना विचारतो की, दहा वर्षात आपली सरकार होती, केंद्रात आपली सरकार होती. दहा वर्षात आपण महाराष्ट्राला काय दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा लाख पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. हिशोबावर विश्वास नसेल तर कोणता चौक ते ठरवा आमचा माणूस तुम्हाला हिशोब देईल. महाराष्ट्रातील शहरांचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.












Click it and Unblock the Notifications