सत्ताधाऱ्यांचा माज की लोकशाहीचा अंत?, मविआचा चहापानावर बहिष्कार अन् सरकारवर 'सडकून' प्रहार!
Maharashtra Budget Session 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महाविकास आघाडीने (MVA) सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत सत्ताधारी महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. "बहुमताच्या जोरावर सरकारमध्ये एक प्रकारचा माज आला असून, महाराष्ट्राची वाटचाल 'उडता पंजाब'च्या दिशेने सुरू आहे," अशा शब्दांत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले.

लोकशाहीचा सन्मान नाही, तिथे चहापान नाही!
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. सत्ताधारी पक्षाचे वर्तन हे सभ्यतेचे असावे लागते, परंतु सध्याच्या सरकारला लोकशाही, घटना आणि विरोधी पक्षाबद्दल कोणताही आदर उरलेला नाही, असा आरोप नेत्यांनी केला.
"जिथे मान-सन्मान नाही, तिथे आम्ही जाणार नाही," असे म्हणत त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एकही नेता उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महाराष्ट्र 'उडता पंजाब' होतोय का?
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात ड्रग्जचा प्रसार इतका वाढला आहे की, महाराष्ट्र आता 'उडता पंजाब' होतोय की काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, अजित पवार यांच्या अपघाताबाबत सरकारने ठेवलेली संदिग्धता आणि अदानींच्या डिजिटल मीटरबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दुटप्पी भूमिका यावरही त्यांनी कडाडून टीका केली. "जनतेवर सक्तीने मीटर लादणे आणि वरून 'एक नंबरचे राज्य' म्हणून छाती बडवणे हे ढोंग आहे," असा टोला जाधव यांनी लगावला.
१ लाख ५७ हजार महिला बेपत्ता; कुठे आहे गृहखातं?
विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिला सुरक्षिततेचा भयावह आकडा समोर मांडला. "राज्यातून 1 लाख 57 हजार महिला आणि मुली बेपत्ता आहेत. हे गृहखात्याचे अपयश नाही का?" असा सवाल त्यांनी केला.
तसेच, भ्रष्टाचाराचा उल्लेख करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये टेंडरसाठी 15 ते 22 टक्क्यांची बोली लावली जात आहे. टेंडरची किंमत दीडपट वाढवून एका विशिष्ट माणसाला काम दिले जाते, यात सर्वसामान्य जनतेचा पैसा लुटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांची लूट आणि कर्जाचा डोंगर
राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रावर आज 9 लाख 32 हजार कोटींचे कर्ज आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. सोयाबीन ४ हजारांच्या पुढे जात नाही, तर मका व्यापाऱ्यांनी १५००-१६०० रुपयांनी खरेदी केला.
शेतकऱ्यांची व्यथा
कर्जामुळे चंद्रपूरच्या एका शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागली, ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. 'लाडकी बहीण' योजनेच्या नावाने दीड हजार रुपये द्यायचे आणि दुसरीकडे राज्य कर्जबाजारी करायचे, असा हा दुटप्पी कारभार असल्याचे त्यांनी म्हटले.
"माणसाच्या जिवाची किंमत फक्त ५ लाख?" - आदित्य ठाकरे
युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी पायाभूत सुविधांच्या कामातील हलगर्जीपणावर बोट ठेवले. मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामावेळी झालेल्या अपघातात रिक्षा चिरडली गेली आणि दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. यावर सरकारने फक्त ५ लाखांची मदत जाहीर केली.
"या राज्यात आपल्या जिवाची किंमत फक्त ५ लाख आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. नोकऱ्या नाहीत आणि जे रस्ते आहेत तिथे मृत्यू दबा धरून बसला आहे, मग हे राज्य नक्की कुणासाठी चाललंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बेरोजगारीचा स्फोट आणि एसीबीच्या धाडी
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आर्थिक सर्वेक्षणाचा दाखला देत सांगितले की, ७० लाख तरुण आज बेरोजगार म्हणून नोंदणीकृत आहेत. शक्तीपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यांतून विरोध असतानाही ८६ हजार कोटींचे बजेट १ लाख कोटींच्या वर नेले जात आहे. मंत्रालयात पडलेल्या एसीबी (ACB) धाडीवर बोलताना त्यांनी संशय व्यक्त केला की, "राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी ही वरून आदेश देऊन केलेली धाड होती का?"












Click it and Unblock the Notifications