Mumbai train accident : दुर्घटनेनंतर प्रवाशांनी चेन खेचूनही ट्रेन थांबली नाही! प्रत्यक्षदर्शीचा दावा
Mumbai train accident : मुंबईमध्ये मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान लोकलमधून पडून पाच प्रवाशांचे जीव गेला. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. 9 जून 2025 रोजी सकाळी 9.20 वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या लोकलला घासले गेले. त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यानंतर आता या दुर्घटनेनंतर मुंबईच्या धोकादायक लोकल प्रवासावर मोठी चर्चा होत आहे.

या अपघातातील प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कसारा ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल ही लाेकल ठाण्याच्या दिशेने जात हाेती. त्याचवेळी सीएसटी ते कसारा ही लाेकल आली. त्याच लाेकलमधील एका प्रवाशाची बॅग या लाेकलमधील प्रवाशांना लागली. त्यामुळे दाेन्ही लाेकलमधील प्रवासी पडले. त्यात आमच्या सीएसटीकडे जाणाऱ्या लाेकलमधील तीन ते चार प्रवासी खाली काेसळले. हा प्रकार कळताच काहींनी इमर्जन्सीची चेन खेचली. मात्र लाेकल थांबलीच नाही, असा दावा प्रत्यक्षदर्शींचा आहे, ती लोकल पुढे ठाण्याला थांबली. त्यानंतर दुसऱ्या लाेकलने पुन्हा मुंब्य्राकडे आलाे. ताेपर्यंत तातडीची मदतच मिळाली नाही. अन्यथा, अनेकांचे जीव वाचले असते, अशी माहिती मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील एक प्रत्यक्षदर्शी प्रवासी दीपक शिरसाठ यांनी ' दिली.
या दुर्घटनेत मृत पावलेला केतन सराेज (23) आणि दीपक हे दाेघेही उल्हासनगरातील रहिवासी आहेत. दाेघेही ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कमध्ये कामाला आहेत. दाेघांचा राेजचा प्रवासही बराेबरच असायचा. सोमवारी अचानक घडलेल्या रेल्वेच्या अपघातामुळे या दाेन मित्रांची ताटातूट झाली.
दुर्घटनेची आपबिती सांगताना दीपक म्हणाला, सकाळी साडेआठ वाजता शहाड येथून कसारा सीएसटी फास्ट लाेकल पकडली. कल्याणला रिकामी झाल्यानंतर डाेंबिवलीत ती भरली. दिव्यात आणखी गर्दी झाली. मुंब्रा काही अंतरावर असतानाच समाेरून अरुंद वळणावर दाेन्ही लाेकलमधील बाजूचे अंतर कमी झाले. त्यातच समाेरच्या लाेकलमधील एका प्रवाशाची बॅग आमच्या तिसऱ्या डब्यातील प्रवाशांना लागली. त्यामुळे दाेन्ही गाड्यांमधील प्रवासी पडले. त्यातच केतनसह आणखी तीन ते चार प्रवाशांचा समावेश हाेता. एकच हल्लकल्लाेळ झाला.
दीपकने दावा केला की, प्रवाशांपैकी एकाने तीन ते चार वेळा चेनही खेचली. परंतु, माेटरमनने मध्ये कुठेही लाेकल न थांबविता ती थेट ठाण्याला थांबविली. ठाणे स्थानकात उतरून पुन्हा दुसऱ्या लाेकलने मुंब्रा गाठले. ताेपर्यंत केतन तसेच अन्य काहीजण डाेक्याला मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत हाेते. रुग्णवाहिकेअभावी जखमींना टेम्पाेतून आणले. घटनास्थळावरून काहींना रुग्णवाहिका मिळाली. परंतु, इतरांना रुग्णवाहिकाही मिळाली नाही. त्यामुळे त्यांना टेम्पाेतून थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. परंतु, केतनसह तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे दीपक हताशपणे सांगत हाेता.












Click it and Unblock the Notifications