Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधगिरी बाळगा! तुफान पाऊस, अनेक ठिकाणी साचले तळे, अजून जोरदार कोसळणार
Mumbai Rain IMD's red alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत, म्हणजेच सकाळी ११:३० पर्यंत, मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता खरी ठरली असून नवी मुंबईत जोरदार पाऊस झाला. यासह इतर ठिकाणीही पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावसाला सुरुवात झाली, ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत असून गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाटही काही भागात झाला. नागरिकांना या धोक्याच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
#WATCH | Maharashtra: Heavy rainfall in Navi Mumbai causes waterlogging in parts of the city. pic.twitter.com/N59Zpx0ALT
— ANI (@ANI) September 15, 2025
अनेक भागात साचले पाणी, वाहतूक मंदावली
मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या शहर भागात, पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागातही काही ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होत असून रस्ते वाहतूक मंदावली आहे.
रेल्वेरुळावर पाणी
कुर्ला, वांद्रे, माटुंगा आणि दादर या भागात रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने सुरू आहे. येत्या तीन तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिली आहे.
मुंबईत पावसाची दमदार हजेरी! कोणत्या भागात किती पाऊस झाला?
मुंबईत काल १४ सप्टेंबर २०२५ रोजीही सकाळी ८:३० पासून आज १५ सप्टेंबरला आज सकाळी ५:३० पर्यंतच्या काळात पावसाने जोरदार बॅटिंग केली. शहराच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, उपनगर आणि शहर या दोन्ही भागांत चांगला पाऊस झाला आहे.
कुठे किती पाऊस? (मि.मी.मध्ये)
- कुलाबा: ८८.२ मिमी
- वांद्रे: ८२.० मिमी
- भायखळा: ७३.० मिमी
- टाटा पॉवर: ७०.५ मिमी
- जुहू: ४५.० मिमी
- सांताक्रूझ: ३६.६ मिमी
- महालक्ष्मी: ३६.५ मिमी
दक्षिण, पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक
दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असले तरी, मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
सावधगिरी बाळगा..! - हवामान विभाग
या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे पण वाहतूक विस्कळीत होऊन दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम वगळता घराबाहेर न पडण्याचा सल्ला मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications