20 वर्षांपासून सावलीसारखी साथ, आता मनसेतून हकालपट्टी; मनसेला मोठं खिंडार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या धोरणांविरोधी काम केल्यामुळे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून खेडेकर भाजप किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब करत मनसेने हा कठोर निर्णय घेतला. खेडेकर यांच्यासोबतच अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

खेडेकर यांचा मनसेसोबतचा प्रवास
वैभव खेडेकर हे मनसेच्या स्थापनेपासून (२००६) राज ठाकरेंसोबत आहेत. कोकणात मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. दापोली आणि खेड परिसरात त्यांची चांगली पकड असून, तरुणांमध्येही ते लोकप्रिय आहेत. त्यांनी खेडचे नगराध्यक्षपदही भूषवले होते आणि खेड नगरपरिषदेत मनसेला सत्ता मिळवून देण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. २०१८ साली शिवसेनेच्या रामदास कदम आणि योगेश कदम यांच्यासोबत त्यांचा मोठा संघर्ष झाला होता. मात्र, अलीकडेच एका कार्यक्रमात रामदास कदम यांनी 'सर्व मतभेद विसरून' एकत्र काम करण्याचे संकेत दिले होते.
भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
गेल्या काही काळापासून खेडेकर यांना भाजपकडून उघडपणे निमंत्रण मिळत असल्याचं दिसून आलं होतं. दापोलीत झालेल्या महायुतीच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावर उपस्थित होते आणि तिथेच त्यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर देण्यात आली. जरी खेडेकर यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त नाकारले असले, तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले होते.
सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी.#MNSAdhikrut pic.twitter.com/paBgD7Ejcq
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 25, 2025
पक्षविरोधी कामामुळे कारवाई
वैभव खेडेकर पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, मनसेकडून त्यांना आणि इतर तीन पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे पत्र पाठवण्यात आले. "आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केले तसेच पक्षविरोधी कार्य केले," असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे कोकणात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण खेडेकर हे या भागात पक्षाचे एक महत्त्वाचे आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात.












Click it and Unblock the Notifications