महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार- राज ठाकरे
सोलापूर : महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की तिथे आरक्षणाची गरजच नाही,असं वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबद्दल भाष्य केलं.
महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही
पुणे, नागपूर अशा ठिकाणी फ्लायओव्हर वैगेरे सुविधा का होतात? मुळच्या लोकांसाठी नाही होत. बाहेरुन आलेल्या लोकांसाठी होतात. ठाणे हा जगातील एकमेव जिल्हा आहे जिथे 7 ते 8 महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरुन येणाऱ्यांचा लोंढा खूप मोठा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही.

यूपी बिहारला नोकऱ्यांच्या जाहिराती येतात पण महाराष्ट्रातील रोजगाराकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. गेली अनेक वर्षे असेच सुरु आहे. आता बेरोजगारांची यादी येत नाही. महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. सर्वात आधी इथल्या मुलांना प्राधान्य द्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार
राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे कोणाच्या खांद्यावर बंदुका ठेवून सुरु आहे. या माध्यमातून मतं हातात घेणं सुरु आहे. यापलीकडे ओबीसी किंवा मराठा मुलामुलींच्या भवितव्याचा विचार कोणाकडूनही केला जात नाही. हे केवळ मतांचं राजकारण आहे. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत, या सगळ्यातून हाताला काहीही लागणार नाही. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे.
लहान लहान मुलं या आरक्षणाच्या वादामुळे आमची मैत्री तुटली असं सांगत होती, हे सगळं आता शाळा-कॉलेजपर्यंत गेलं आहे. हे चित्र भीषण आहे. असे वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हते. ज्या महाराष्ट्राने आजवर देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे, हे चित्र दुर्दैवी आहे. अशाप्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीवेळी दूर ठेवले पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केले.
मतांसाठी माथी भडकावण्याचा उद्योग
महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. जितक्या नोकऱ्या उपलब्ध होतात तितक्या दुसरीकडे होत नाही. केंद्र सरकार अनेक ठिकाणी खासगीकरण करत आहे. खासगी शिक्षणसंस्था आणि कंपन्यांमध्ये आरक्षण आहे का? मग किती नोकऱ्या उपलब्ध होणार. त्यामुळे आपण या सगळ्या बाबी नीट तपासल्या पाहिजेत. हा सगळा माथी भडकावून मतं मिळवण्याचा उद्योग आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.












Click it and Unblock the Notifications