राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार, सरकारचा मोठा निर्णय
Chhatrapati Shivaji Maharaj statue : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा 28 फुटांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला होता. पुतळा अवघ्या आठच महिन्यां कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची प्रचंड झोड उठवली होती. या प्रकरणी बांधकाम सल्लागार आणि शिल्पकाराला अटकही करण्यात आली. आता राज्य सरकारने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी 20 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया काढली आहे.

सुमारे 20 कोटींचा येणार खर्च
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. इच्छूक शिल्पकारांना 3 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे 3 फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावे लागणार आहे. 4 ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल आणि राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
शिल्पकार जयदीप आपटे बांधकाम सल्लागार पाटील अटकेत
मागील वर्षी 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला. शिल्पकार जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा अनुभव नसतानाही भारतीय नौदलाकडून त्याला हे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे याला हा पुतळा उभारण्यासाठी 26 लाख रुपये मिळाले होते, असा दावा विरोधकांनी केला होता. 26 ऑगस्ट 2024 पुतळा पडल्यानंतर पोलिसांनी स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला आरोपी चेतन पाटीलला आणि शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली.
पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा वैभव नाईक यांचा आरोप
शिवसेना (उबाठा) आमदार वैभव नाईक यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम नौदलाचा होता. मग झालेला साडे पाच कोटीचा खर्च जिल्हा नियोजन मधून का करण्यात आला? या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्या ठिकाणी मिळालेले पैसे लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटण्यात आले. असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता.












Click it and Unblock the Notifications