मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित
छत्रपती संभाजीनगर : मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात पावसाने आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसात 78 जनावरे दगावली आहेत. हिंगोली आणि बीड जिल्ह्यात दोन जण दगावली आहेत तर लातूरमधून एक जण वाहून गेला आहे. 100 पेक्षा जास्त कच्च्या घरांची पडझड झाली आहे.
मराठवाड्यात मागील दोन दिवासांपासून होणाऱ्या मुसळधार पावसाने 420 महसूल मंडळांपैकी 240 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात पावसानं धुमाकुळ घातला असून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्या अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यानं मराठवाडा आणि विदर्भात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 47 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून 60 मंडळात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. नांदेड जिल्ह्यात 42 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे तर परभणीत 50 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये 25 जनावरे मृत्युमुखी, एक जण वाहून गेला
गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
नांदेड तालुक्यात दुपारी 4 वाजताच्या दरम्यान पासदगाव पुलावरून पाणी जात होते. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाचे काहीच न ऐकता पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे.उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्या परीसरात जवळपास 25 लोक अडकले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कडून राज्य आपत्ती प्रतिसाद दल ची तुकडी त्या ठिकाणी पाठवून शोध व बचाव कार्य करुन 25 जणांना पुरातून सुखरुप बाहेर काढले.
25 जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. उद्या पाऊस थांबल्यास नुकसानीचे पंचनामे सुरू होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गोदावरी नदीची नांदेड शहरातील धोक्याची पातळी 354 मीटर आहे. संध्याकाळी 8 वाजता ही पातळी 352.75 होती. या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचाव पथक तैनात असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड, अर्धापूर सर्वाधिक पाऊस
आज नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, या तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर,दभाद, भरड, मालेगाव या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस झाला अर्धापूर मध्ये 170 मिलिमीटर पाऊस बारा तासात झाला आहे. तर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण दोन्ही भागात सरासरी 125 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दुपारी नांदेड शहरात अनेक भाग जलमय झाले होते. गोदावरी नदी काठावरील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. वसरणी पंचवटीनगर साईबाबा कमान जवळ एका इमारतीमध्ये दुस-या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन व्यक्तिंना बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले.
पावसाने जिल्ह्यातील 28 कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले असून सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील अनेक नाल्यांना दुपारी पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
परभणी जिल्ह्यात पिकाचं मोठं नुकसान
परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत झालेल्या पावसाने पिकांतं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. 52 महसूल मंडळापैकी 50 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून 2 लाख 12 हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीन, कापूस, मूग, हळद आदी अनेक पिकांचे नुकसान झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी दोन दिवसात 132 मिलिमीटर इतका पाऊस झाला,












Click it and Unblock the Notifications