राज ठाकरेंविरोधात DGPकडे तक्रार;'ते' विधान भोवणार, तीन वकीलांची वादात उडी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Raj Thackeray Latest Marathi News : महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदी विरुद्ध मराठी भाषेचा वाद विकोपाला पोहोचला असून, याचे केंद्रस्थान ठरले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे. त्यांच्या एका कथित वादग्रस्त भाषणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याच भाषणासंदर्भात आता थेट मुंबई उच्च न्यायालयातील तीन वकिलांच्या गटाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) तक्रार दाखल केली आहे.
वकिलांची धाव, तक्रारीला आली धार!
अधिवक्ते पंकज कुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा आणि आशिष राय या तिघांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांना पाठवलेल्या तक्रारीत राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रात जातीय तणाव आणि हिंसाचार भडकवणारे भाषण दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मराठीत लिहिलेल्या या तक्रारीत राज ठाकरे यांच्या विधानांची सखोल चौकशी करण्याची, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि सार्वजनिक अशांतता वाढू नये यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय केले होते चिथावणीखोर विधान!
राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या या तक्रारीत त्यांच्या कथित चिथावणीखोर टिप्पण्या, मनसे कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या धमक्या, हल्ले आणि सामाजिक अपमानाचा स्पष्ट उल्लेख आहे. नेमके कोणते विधान इतके वादग्रस्त ठरले, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
तर, ५ जुलै रोजी एनएससीआय डोम येथे दिलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी, "जर तुम्ही लोक स्थलांतरितांना मारहाण करत असाल तर त्यांना मारहाण करा, परंतु या प्रकरणाचा कोणताही व्हिडिओ बनवू नका," असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतरच वकिलांनी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
इतर राज्यातून आलेल्यांना केले जातेय टारगेट!
तीन वकिलांनी आपल्या तक्रारीत मनसे कार्यकर्त्यांकडून स्थलांतरित नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांकडे लक्ष वेधले आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मराठी भाषेच्या नावाखाली महाराष्ट्रात इतर राज्यांमधून आलेल्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत.
त्यांना मारहाण करणे आणि सार्वजनिकरित्या अपमानित करणे असे प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना समोर आल्याने, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि असंवैधानिक बनली आहे. यामुळे राज्यातील सामाजिक सौहार्द आणि कायदा व सुव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्र पोलीस काय भूमिका घेतात आणि या भाषावादाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications