कुणीतरी सांगा, आमचं चुकलंय तरी कुठे, मराठ्यांना उठाव हा करावाच लागेल- जरांगे पाटलांचा एल्गार
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा आज पार पडत आहे. या मेळाव्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

माझा समाज या राज्यातील जनतेसाठी झिजलाय. स्वतः या समाजाने दुसऱ्यांसाठी त्याग दिलाय. आमचा निर्णय चुकलायं कुठला कुठे, आम्ही श्रीमंतावर नाही की गरीबावर अन्याय केला नाही. या राज्यातील शेतकऱ्यांने नेमकं केले तरी काय, कोणी तरी आम्हाला सांगा, आमची चुक ती काय, आमच्यावर अन्याय कमी व्हावा म्हणून आम्ही संघर्ष केलाय.
जरांगे पाटील म्हणाले की, मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरलं आहे. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या समाजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. पण माझा नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका.
जरांगे पाटील म्हणाले की, लढायला शिका. हिंदू धर्माने अन्यायाविरोधात शिकवलं. कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचं शिकवलं आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने शिकवलं आहे. आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे. इथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्य आणि केंद्राची सुविधा घेतली. आम्ही 14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.
"कोणावर अन्याय होऊ नये, म्हणून मराठा समाजाने तलवारी हाती घेतल्या आहेत. आमचे रक्त सांडले, आमचे माणसे मारली गेली, पण आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला नाही," असे भावनिक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. त्यांनी पुढे म्हटले की, "कोणीही आले तरी झुकायचे नाही, परंतु अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करणे आवश्यक आहे."
उठाव हा करावाच लागणार आहे. माझ्या समाजाने काहीही केलेले नाही. का आमच्या वाट्याला अन्याय आलाय, असं आम्ही काय पापं केलेय. आमच्या समुदायाला वाट्याला फक्त अन् फक्त अन्याय आलाय.












Click it and Unblock the Notifications