मराठ्यांना डावलून निवडणूक घेतली तर तुमचे गणित बिघडवून टाकू! डाव टाकला की, सरकारचा खेळ खल्लास- जरांगे
Manoj Jarange on Devendra Fadnavis : मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका जिंकण्याचे गणित जे करण्यात आले होते ते सर्व निष्फळ ठरले आहे त्यामुळे पुन्हा मराठ्यांना डावलून जर निवडणूक घेतली तर पश्चाताप होईल आणि आम्ही तुमचे सर्व गणित बिघडवून टाकू असा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात मनोज जरांगेंवर उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तर पाडापाडी होणार..
लोकसभा निवडणुकीत महायुतीला खासकरुन भाजपला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटाका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील काय भूमिका घेतात, याकडं लक्ष लागलं होतं. आता जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तिसरी आघाडी वगैरे काही नाही. परंतु निवडणूक लढवायची वेळच आली तर सर्व उमेदवार अपक्ष म्हणून उभे करू. हेही नाही ठरले तर राज्यभर पाडापाडी करणार असल्याचे विधान त्यांनी केले. य राजरत्न आंबेडकर यांच्या विधानावर त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले होते राजरत्न आंबेडकर
तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री जरांगे पाटील असतील, असे वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांनी केले होते. त्यावर जरांगे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. मला राजकारणात जायचे नसल्याचे स्पष्ट करत 'मी स्वार्थी नाही, पण समाजाच्या स्वार्थासाठी आपण काम करत आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सध्या तब्येत बरी असल्याचेही ते म्हणाले.
मनोज जरांगेचा दसरा मेळावा
नारायण गडावर मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्यासाठी सुमारे 52 हजार स्वयंसेवक तयारीला लागले आहेत. गडाच्या ७१३ एकरचा परिसर असून 15 ते 20 जेसीबीद्वारे साफसफाईची कामे अंतिम टप्प्यात आहे. जेवण, पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह आदींची व्यवस्था तेथे असतील. राज्यातील मराठ्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे. नेत्यांच्या मागे लागू नका. त्यांच्या प्रचाराला, सभेला पळू नका. अशा सामाजिक मेळाव्यात या असे आवाहन जरांगे यांनी केले.
आरक्षणाबाबत सरकारला आचारसंहितेपूर्वी सर्व निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा सगळे बिघडेल. सरकार 'आम्ही मोट बांधली' असा आव आणतेय. परंतु मराठ्यांनी डाव टाकला की, सरकारचा खेळ 'खल्लास' होईल," असा इशाराही जरांगे यांनी दिला. भाजपमधील मराठा नेत्यांनो, तुमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगा, तुम्ही आरक्षण द्या. मग मी राजकारणाचा एक शब्दही काढणार नाही. मला महायुती व महाआघाडीशी काही देणे-घेणे नाही,असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications