मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक; CSMTत गोंधळ, रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात, रस्त्यातच शेगडी पेटवली..!
Maratha Protest Turns Aggressive in Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आता आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि प्रशासनाकडून सोयीसुविधांची अपुरी व्यवस्था असल्याने आंदोलकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याच रागातून काही आंदोलकांनी शनिवारी सकाळी थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनबाहेरील रस्ता अडवला, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली.
अपुरे पाणी आणि जेवणाची सोय
आंदोलकांनी आरोप केला आहे की त्यांना पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था आणि निवारा पुरवण्यात आलेला नाही. त्यातच मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या (खाऊगल्ली) प्रशासनाने बंद ठेवल्याने, मराठा आंदोलकांना जेवण मिळाले नाही.
रात्रभर उपाशी राहिल्यामुळे अनेकजण संतप्त झाले. याच संतापातून काही आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनबाहेरील रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केली, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

पोलिस असफल, रॅपिड ॲक्शन फोर्स मैदानात
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाल केली. डीसीपी प्रवीण मुंडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. काही आंदोलक बसवर चढले, तर काहींनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंघोळ करून आपला राग व्यक्त केला.
आंदोलकांची संख्या आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अखेर रॅपिड ॲक्शन फोर्स (Rapid Action Force) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) तुकडी तैनात केली आहे.
आंदोलकांकडूनच नाश्त्याची सोय
प्रशासनाच्या अपुऱ्या सोयींमुळे आंदोलकांनी स्वतःच एकमेकांची मदत करायला सुरुवात केली आहे. परभणीमधील एका मराठा आंदोलकाने नाश्त्याचा टेम्पो आणून आंदोलकांसाठी चहा, केळी आणि पोह्यांची व्यवस्था केली आहे. यामुळे, काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी सीएसएमटी परिसरात अजूनही प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. आता पोलीस आणि प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications