'कोकाटे आऊट...मुंडे इन'..अजितपर्व!, कोणी दिला इशारा, नेमकं काय घडलं, राजकीय वर्तुळात चर्चा!
Manikrao Kokate,Maharashtra News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
अंधारे यांच्या "कोकाटे आऊट आणि मुंडे इन" या आशयाच्या पोस्टमुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा पुढील तीन दिवसांत निश्चित मानला जात आहे.

धनंजय मुंडेंना राजीनामा का द्यावा लागला होता?
धनंजय मुंडे यांना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. ९ डिसेंबर २०२४ रोजी ही हत्या झाली होती आणि या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली होती.
यामुळे विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु महायुती सरकारने सुरुवातीला चालढकल केली. अखेर, देशमुख यांच्या हत्येचे विदारक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारला नाईलाज झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला, जो त्यांना तत्काळ द्यावा लागला. मुंडेंवर कृषी साहित्य खरेदी प्रकरणात घोटाळा केल्याचाही आरोप होता.
कोकाटे आऊट... मुंडे इन...!!#अजितपर्व
— SushmaTai Andhare (@andharesushama) July 26, 2025
'कोकाटे आऊट... मुंडे इन'
उच्च न्यायालयाने या प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीनचिट दिल्यामुळे आता पुन्हा त्यांचा राज्य मंत्रिमंडळात प्रवेश होणार असल्याचा दावा केला जात आहे. सुषमा अंधारे यांनी शनिवारी सकाळी केलेल्या एका पोस्टने या चर्चेला अधिकच हवा दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये "कोकाटे आऊट... मुंडे इन" असे चार शब्द लिहिले, आणि त्यासोबतच 'अजितपर्व' असा उल्लेखही केला.
अंधारे यांच्या या पोस्टमुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित झाल्याचे मानले जात आहे, आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रिमंडळाची कवाडे खुली होणार असल्याचे संकेतही यातून मिळत आहेत.
'लाडकी बहीण' योजनेवरूनही निशाणा
सुषमा अंधारे यांनी अन्य एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेवरूनही महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी भावनिक शब्दांत म्हटले आहे:
"सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया,
"दादा' अनाथांचे'नाथ' होऊन 'देवा'सारखे धावत या."
निवडणूकीतल्या रक्षाबंधनासारखेच यंदाही मोठमोठे बॅनर लावा.
लाडक्या बहिणी ओवाळणीच ताट घेऊन २१०० च्या ओवाळणीची वाट बघताहेत.
..अन्यथा दादाभाईभाऊ लबाड ठरेल."
या पोस्टसोबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटोही जोडला आहे. यातून त्यांनी सरकारवर केवळ आश्वासने देऊन निवडणुकीत मते मिळवल्याचा, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी न केल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे.












Click it and Unblock the Notifications