माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले; म्हणाले-कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, पुन्हा उभा केला वाद!
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी "ढेकळांचे पंचनामे करायचे का?", असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला. आता माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे वक्तव्य करून स्वत:च टिकेला आमंत्रण दिल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
'कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे', असे विधान माणिकराव कोकाटे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात केले. अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात त्यांनी हे विधान केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
17 पिकांसाठी सुमारे दीडपट हमीभाव जाहीर
या कार्यक्रमात पुढे बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने १७ पिकांसाठी सुमारे दीडपट हमीभाव जाहीर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत. अजित पवार यांनी मला हे कृषी खाते जाणीवपूर्वक दिले आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीआधारित व्यवसाय करावे
शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन, शेती आधारित व्यवसायात करिअर करावे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमधील विधानावर कोकाटेंनी दिले स्पष्टीकरण
नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे पाहणी करत असताना त्यांनी मोठे विधान केले होते. ते म्हणाले की, "हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?" असे ते म्हणाले. त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने अखेर त्यांनी माफी मागितली. तसेच घुमजाव करत "मी असं काही बोललोच नाही," असं स्पष्टीकरण देखील त्यांनी केले होते. या घटनेला एक दिवस होत नाही, त्यांना कृषिमंत्रीपदाबाबतच बेताल विधान करून त्यांना आता हे पद ओसाड गावची पाटीलकी वाटू लागली आहे.












Click it and Unblock the Notifications