महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा पाच दिवसांसाठी 'हाय अलर्ट'
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सक्रिय झाला आहे. यामुळे येत्या पाच दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

या राज्यांना हाय अलर्ट
१५ ते २० ऑगस्ट या कालावधीत आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः १८ ते २० ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल, पण हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील.
जम्मू-काश्मीरमध्येही पुढील पाच दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाम या राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पाऊस जोरदार कोसळणार आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकण या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
- कोकण: सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
- विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र: या भागांमध्येही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications