'बटेंगे तो कटेंगे','एक हैं तो सेफ है'; महाराष्ट्राच्या निवडणुकीत रंगतोय जातीयवादाचा मुद्दा
Maharashtra Casteism Prachar issue : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मोदी-शहा-योगी असे स्टार प्रचारक महायुतीसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमध्ये सभा गाजवत आहेत. अशातच या तिन्ही नेत्यांच्या सभांमधून पुन्हा एकदा हिंदू मतांच्या अनुषंगाने प्रचाराला रंग दिला जात आहे.
या विधानसभा निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'एक है तो सेफ है' चा नारा भाजप नेत्यांकडून जाहीर सभांमधून दिला जात आहे. भाजपनं हिंदू मतांच्या एकीसाठी या घोषणा दिल्यात हे काही नवीन सांगण्याची गरज नाही. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात आता जातीयवादाचा मुद्दा पुन्हा रंगला आहे, असे दिसून येत आहे.

मविआच्या नेत्यांनी घेतला प्रचारावर आक्षेप
भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून महायुतीच्या प्रचारासाठी अशा प्रकारे दिल्या जाणाऱ्या घोषणांवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. यात मविआचे बडे नेते शरद पवारांनी भाजपच्या या रणनितीवर टीका केलीय. भाजप निवडणुकीत जातीयवाद करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय.
मोदींचा प्रत्येक सभेत काय आहे नारा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये सभा झाल्या आहेत. तर आगामी काळात देखील सभांचे नियोजन आहे. मोदी देखील प्रत्येक सभेमध्ये कॉंग्रेसवर जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप लावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रचारसभेपासून एक है तो सेफ है चा नारा दिलाय. तर योगी यांनी 'बटेंगे तो कटेंगे' असा नारा देत हिंदू मतदारांना एक प्रकारे सजग होण्याचे आवाहन केले.
ठाकरे, राऊतांनीही लगावला टोला
'एक है तो सेफ है' या भाजपच्या घोषणेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही निशाणा साधलाय. मोदी आणि शहांच्या महाराष्ट्रातील प्रचारामुळं सामान्यांना असुरक्षित वाटू लागल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला.
अजित पवारांचाही घोषणेला विरोध
दुसरीकडे महायुतीचे एक बडे नेते अजित पवार यांनी देखील योगी, मोदींच्या विधानाला विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्रातल्या मतदार उत्तरेतील राज्यांतील मतदारांसारखा नाही. त्यामुळं बटेंगे तो कटेंगे ची घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही असे स्पष्ट विधान अजित पवारांनी केले.
राज ठाकरे म्हणाले- हिदूंनी एकत्र यावे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीत प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदूह्रदयसम्राट उपाधी काढण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून त्यांनी ते काढून टाकलं अशी टीका राज ठाकरेंनी केलं.
तसंच आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला."मुस्लिम मौलवी आज फतवे काढत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे तुम्हाला माहित आहे. विचारधारा नावाची काही गोष्ट नाही. तर मौलवी जर उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत असतील, तर मी देखील हिंदूंना जाहीर आवाहन करतो की, त्यांनी देखील हिंदू म्हणून एकत्र येऊन मतदान केले पाहिजे.
जनतेचा कौल नेमका कुणाला?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात आतापर्यंत विकासावर चर्चा व्हायची. विरोध व सत्ताधारी एकमेकांवर विकासाच्या मुद्द्यावरुन धारेवर धरायचे. परंतु यंदाच्या निवडणुकीत जातीयवादाचा मुद्दा जास्तच रंग घेताना दिसून येत आहे. असे असले तरी जनतेचा कौल नेमका कुणाला असेल ते येणारा काळच ठरवेल, एवढं मात्र नक्की. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नेमकं काय चालू आहे, हे येत्या काळातच समोर येईल.












Click it and Unblock the Notifications