महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय फडणवीस की एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरे कितव्या स्थानी?
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले असले तरी, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला. आता महायुतीचे सरकार स्थापन होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील जनतेचा कल आणि महत्त्वाच्या नेत्यांविषयी असलेला विश्वास जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सी व्होटर (C Voter) संस्थेने केलेल्या एका महत्त्वपूर्ण सर्व्हेक्षणातून महाराष्ट्रातील जनतेचा मूड आणि सर्वाधिक पसंतीचा नेता कोण, याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक विश्वासार्ह नेता: फडणवीस आघाडीवर!
या सर्व्हेनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 'सर्वाधिक विश्वासार्ह नेता' म्हणून प्रथम स्थान पटकावले आहे. राज्याच्या ३५ टक्के जनतेने त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे.
त्यांच्या खालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. सुमारे १७.८ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना विश्वासार्ह नेता मानले आहे.
या यादीत तिसऱ्या स्थानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, ज्यांच्यावर १४.४ टक्के जनतेने विश्वास दर्शवला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ११.२ टक्के लोकांची पसंती मिळाली असून ते चौथ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनाही ४.२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सर्वाधिक जनतेचा विश्वास आहे, तर सत्ताधारी आघाडीतील एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि विरोधकांकडून उद्धव ठाकरे व शरद पवार यांना जनतेने पसंती दिली आहे.
महाराष्ट्रासमोरील मोठे आव्हान कोणते?
नेत्यांच्या पसंतीबरोबरच, जनतेला सध्या राज्यात कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा वाटतो, हे देखील या सर्व्हेतून समोर आले आहे.
सर्वाधिक लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषी संबंधित समस्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर वाढती बेरोजगारी हा तरुणाईसमोरील गंभीर मुद्दा असल्याचे जनतेने नमूद केले आहे. तर भ्रष्टाचार हा तिसऱ्या क्रमांकावरचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे या सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे.
जनतेच्या या कौलावरून स्पष्ट होते की, महायुतीचे नेतृत्व लोकांना सध्या अधिक विश्वासार्ह वाटत असले, तरी शेतकरी आणि बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. महायुती सरकारला ५ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे.












Click it and Unblock the Notifications