महायुतीचाच बोलबाला..! राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध, पहा कोण झाले खासदार
मुंबई : राज्यसभेच्या 12 जागा रिक्त होत्या. या जागांसाठी तीन सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. रिक्त बारा जागांपैकी दोन जागा या महाराष्ट्रातील आहे. या दोन जागांसाठी भाजप व राष्ट्रवादीत रस्सीखेंच सुरु होती. मात्र आता या दोन्ही जागा महायुतीकडे बिनविरोध आल्या आहेत. राज्यातून या जागेसाठी भाजपने रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे साताऱ्याचे नितीन पाटील यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नितीन पाटील यांच्या जागेचा शब्द अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी दिला होता.
राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली होती. राज्यसभेच्या दोन जागांसाठीच्या निवडणुकीला भाजपा पक्षाकडून धैर्यशील पाटील यांना तिकीट देण्यात आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत दोन अपक्षांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु अर्जाच्या पडताळणीमध्ये अपक्षांच्या वतीने भरण्यात आलेल्या अर्जावर अनुमोदकांच्या साह्या नसल्याचे समोर आले. त्यामुळे हे तिन्ही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. सोमवारी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या उमेदवारांना राज्यसभेवर नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी साताऱ्यातील वाई येथे सभा घेतली होती. साताऱ्याच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असे आश्वासन अजित पवार यांनी त्यावेळी दिले होते. त्यानंतर नितीन पाटील यांना खासदारकीची संधी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी नितीन पाटील यांना तिकीट दिले आणि आणि आपले आश्वासन पूर्ण केले. आता नितीन पाटील राज्यसभेचे खासदार होणार आहेत.
अजित पवार गटाचे नूतन खासदार नितीन पाटील हे सातारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. तसेच वाई-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे ते बंधू आहेत. नितीन पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हेही खासदार होते. दुसरीकडे भाजपाने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली होती.
धैर्यशील पाटील हे मूळचे रायगड जिल्ह्यातील आहेत. धैर्यशील पाटील हे माजी आमदार आहेत. सध्या ते रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी याआधी रायगड, रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली होती. परंतु तेव्हा त्यांना तिकीट मिळाले नाही. मात्र आता त्यांना राज्यसभेच्या रुपात खासदारकी मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications