Maharashtra Rain महाराष्ट्रात मुसळधार, मराठवाडा ओलाचिंब, नांदेडमध्ये एसडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात
Maharashtra Rain: महाराष्ट्रात कालपासून जोरदार पाऊस सुरु असून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची संततधार सुरु आहे. काल रात्रीपासून अविरत पाऊसच सुरु असून नद्या नाल्यांना पूर आला आहे.
मराठवाड्यात सर्वदूर पाऊस सुरु असून सातही जिल्ह्यात जोर'धार' पडत आहे. जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, बचावकार्यासाठी एसडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात पावसाची स्थिती बिकट बनली आहे. तर जळगावसह विदर्भातही पावसाने गंभीर स्थिती बनली आहे.

नांदेड
जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस
नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मांजरा, पैनगंगा, आसना,लेंडी, सीता या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. आज २ सप्टेंबर रोजीही जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केला आहे. जिल्ह्यात बचावकार्यासाठी स्थानिक पथकांसह एसडीआरएफच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
घरांची पडझड, जनावरं दगावली
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक घरांची पडझड झाली, जनावरेही दगावली आहेत. नांदेड, किनवट या शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जालना
मंठा तालुक्यातील पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी-माळतोंडी, देवठाणा या गावांना पुराचा फटका. पांगरी खुर्द गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी, रामसगाव, शेवता, बानेगाव, लिंगसेवाडी, सौंदलगाव, मंगरूळ जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातले नदी-नाले दुथडी भरून वाहिले. शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मंठा, अंबड, बदनापूर, परतूर, जालना शहरासह तालुक्यातल्या बहुतांश भागात रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पावसाची संततधार रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.
बीड
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, बीड - परळी वाहतुकीला फटका
बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावरील पूररेषेच्या आत आणि आसपास राहणाऱ्या रहिवाशांनी आज रात्री विशेष सावधानता बाळगावी. पावसाच्या तीव्रतेमुळे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे पूराचा धोका संभवतो. आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, आवश्यक असल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनाच्या सूचना सतत ऐकत राहा आणि परिस्थितीचा आढावा घेत राहावे. बीड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आपत्कालीन स्थितीत त्वरित मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने अलर्ट रहावे असे आवाहन खा. बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
तसेच परळी-बीड हायवेवरील पांगरी (वाण नदी) येथील पर्यायी पूल पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. परिस्थिती गंभीर असून, पूल कधीही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, परळीवरून बीड आणि बीडवरून परळीला जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. आपल्या सहकार्याने दुर्घटना टाळता येऊ शकते.
धाराशिव
जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यात 31 ऑगस्ट शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असून एक सप्टेंबर सकाळपर्यंत जिल्ह्यात पंधरा मिलिमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत 551 मिलिमीटर पाऊस झाला असून आज सोमवारी 2 सप्टेंबर रोजी सुद्धा पाऊस होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा,मुंबई वेधशाळेने व्यक्त केला आहे.या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात असून जिल्ह्यातील 40 सिंचन प्रकल्प पूर्ण भरले असून यात सर्वाधिक चार मध्यम प्रकल्प परंडा तालुक्यातील शंभर टक्के भरले आहेत तर उमरगा लोहारा तालुक्यात अद्याप एकही मध्यम प्रकल्प भरलेला नाही.
जळगाव
जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांशी सर्वच भागात आज मध्यरात्री दमदार पाऊस झाला त्याचबरोबर हातनुर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात देखील पाऊस झाल्याने हतनूर धरणाची आठ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आली असून 39 हजार 729 क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. नदीपात्रा जवळ असलेल्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
लातूर
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज; जिल्हावासियांनी सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानुसार 02 सप्टेंबर 2024 रोजी लातूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 41 ते 61 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे लातूर जिल्हावासियांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी राहावे. पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. शाळकरी मुलांनी नदी-नाले तलावावर पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications