पोरांनो तयारीला लागा; राज्यात लवकरचं 7,500 पदांसाठी होणार पोलिस भरती
मुंबई : पोलिस होण्याचं स्वप्न पाहणा-या राज्यातील तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे.मागील दोन वर्षांत राज्यात तब्बल 35 हजार रिक्त पदांवर पोलीसांची भरती झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा भरती केली जाणार आहे. तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी असणार आहे.
जवळपास 7500 पदांवर ही भरती होणार असून, यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात अद्यापही पोलिसांचं संख्याबळ कमी असल्या कारणाने या वर्षअखेरीस पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
डिसेंबर महिन्यातील पोलीस भरती प्रक्रियेआधी राज्यातील 14,471 पोलीस पदांवरील भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश गृह विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये चालक शिपाई, 5 जिल्ह्यांमध्ये बँड्समॅन आणि 25 जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई अशा पदांवर भरती प्रक्रिया राबवत त्याअंतर्गत लेखी परीक्षा घेण्यात आली. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.

दरम्यान पावसाच्या दिवसांमध्ये मैदान न मिळाल्याने भरती प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाल्याची बाब समोर आली. आता मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच नव्या भरती प्रक्रियेची सुरुवात केली जाणार आहे. येत्या काळात राज्यात पोलीस प्रशिक्षण केंद्राचीं क्षमता वाढवत सध्याचा 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रांचा आकडा दुपटीने वाढवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय दिसत आहे.
करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. मागील वर्षांत अनुक्रमे 18 हजार व 17 हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी 7 ते 8 हजार पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा 7,500 हजार पदांसाठी भरती होणार आहे.












Click it and Unblock the Notifications