'नदी मांजरीसारखी असते आपली वाट कधी विसरत नसते', डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी पोस्ट
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. नद्यांनी आपले रौद्र रूप दाखवल्यामुळे शेती, घरे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत, डॉ. नानासाहेब थोरात यांची 'नदी आपली वाट विसरत नसते....!!!!' ही अत्यंत विचार करायला लावणारी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मानवाने केलेल्या नदी-नाल्यांवरील अतिक्रमणाचे गंभीर परिणाम कसे समोर येत आहेत, यावर ही पोस्ट मार्मिक भाष्य करते.

डॉ. थोरात यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबईतील मिठी नदी, कोल्हापूरमधील जयंती नाला, चेन्नईतील गायब केलेली नदी आणि पुण्यातील मुळा-मुठा नद्यांची दयनीय अवस्था यांची उदाहरणे दिली आहेत. 'माणसांनी नदीचा नाला केला म्हणून नदी स्वतःच अस्तित्व विसरत नाही' या त्यांच्या वाक्यातून मानवाच्या लोभी वृत्तीवर आणि निसर्गाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यावर जोरदार टीका केली आहे.
नदीच्या पात्रातील वस्ती: 'आपणच नदीत जाऊन राहिलोय'
थोरात यांच्या मते, 'खरंतर नदी आपल्याकडं राहायला येत नाही आपणच नदीत जाऊन राहिलोय.' ही वस्तुस्थिती सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, नगर या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थितीमुळे प्रकर्षाने दिसून आली आहे. पूर्वी कोरड्या दुष्काळाचे आगार असलेले अनेक तालुके आज ओल्या दुष्काळात बुडाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 'सीना नदी'ने आपले अस्तित्व दाखवून देत तीन लाख एकर शेती पाण्याखाली बुडवल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निसर्गाचा कोप: गरीब-श्रीमंत भेदभाव नाही?
पुराच्या संकटात गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो, असे असले तरी, डॉ. थोरात यांनी 'निसर्गपण स्वार्थी असतो श्रीमंतावर अन्याय करतो पण गरिबांवर तो ज्यास्तच अन्याय करतो' अशी खंत व्यक्त केली आहे. एका व्हिडिओमध्ये पुरात घर वाहून गेलेल्या एका वृद्ध आजीचे झालेले नुकसान आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये माजी मंत्र्यांच्या दारात फॉर्च्युनर तरंगतानाचे दृश्य या दोन टोकाच्या स्थितीचे वर्णन करून त्यांनी या विषमतेवर प्रकाश टाकला आहे. 'दारात बसून रडणारी आज्जी आणि शेतकऱ्याच्या गोठयात दाव्यासहित मेलेली जनावर पहिली कि निसर्गाच्या स्वार्थीपणाची अजूनच खात्री होते' असे ते म्हणतात.
भविष्यातील धोक्याची सूचना
'येणारा काळ अजूनच अवघड असणार आहे. गावोगावची हीच अवस्था आज नहितर उद्या होणार आहे,' अशी गंभीर भविष्यातील धोक्याची सूचना थोरात यांनी दिली आहे. 'नदी मांजरीसारखी असते आपली वाट कधी विसरत नसते' या वाक्याने त्यांनी आपल्या विचारांची सांगता केली आहे.
निसर्गाला कमी लेखून उभी केलेली लोभी साम्राज्ये अखेरीस स्वतःचे अस्तित्व दाखवणाऱ्या निसर्गापुढे टिकत नाहीत, हाच या व्हायरल पोस्टचा मूळ गाभा आहे. पूरग्रस्तांच्या नुकसानीसोबतच मानवाने निसर्गाच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये केलेल्या अक्षम्य हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या या भीषण परिस्थितीवर ही पोस्ट चिंतन करण्यास भाग पाडते.
डॉ. नानासाहेब थोरात यांची मूळ पोस्ट
नदी आपली वाट विसरत नसते....!!!!
२६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला समजले कि मुंबईत मिठी नावाची नदी आहे.
मी ९ वर्षे कोल्हापुरात राहिलोय. शेकडो वर्षांपासून कोल्हापूरच्या मध्यातून एक छोटी नदी वाहत होती. हळू-हळू तिच्या दोन्ही तीरावर अतिक्रमण करून,घर-दुकान बांधून, लोकं एवढ्यावरच थांबली नाहीत, तर सगळ्या कोल्हापूरची गटार त्यामध्ये आणून सोडली आणि नदीचच नाव बदलल "जयंती नाला" २०१९ आणि २०२१ मध्ये याच जयंती नाल्यान निम्मं कोल्हापूर चार दिवस पाण्यात बुडवलं होत. माणसांनी नदीचा नाला केला म्हणून नदी स्वतःच अस्तित्व विसरत नाही. तीच अवस्था चेन्नईची. चाळीस तलावांना जोडणारी एक छोटीसी नदी चेन्नईतून जाऊन पुढे समुद्राला मिळत होती. हपापलेल्या माणसांनी चाळीस तलाव मुजवून सिमेंटची जंगल उभा केली एवढयावरच थांबली नाहीत तर चेन्नईतील नदीचं गायब केली. एका दिवसाच्या पावसानं नदी आणि तलावांनी मिळून चेन्नई पाण्यात बुडवली. जोडीला विमानतळावरची विमान बदकासारखी पाण्यावर पोहायला सुद्धा लावली. हीच अवस्था पुण्याची झाली आहे. मुळा-मुठा नद्यांपेक्षा युरोप-अमेरिकेतील गटार मोठी असतील अशी अवस्था या नद्यांची पुणेकरांनी केली आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून पावसाळ्यात एकदा तरी पुणेकरांच्या घरी या नद्या राहायला येतात आणि चांगलेच भाडे देऊन जातात.
खरंतर नदी आपल्याकडं राहायला येत नाही आपणच नदीत जाऊन राहिलोय.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मी कुर्डुवाडीच्या पुढे जाताना एक बोर्ड पहिला "सीना नदी" बाजूला बघितले तर ऐन पावसाळ्यात कोरडाठाक पडलेला ओढाच वाटला तो. मनात विचार आला याला नदी का म्हणत असतील, उजाड माळरानागत दिसणारे पात्र याचा काय फायदा शेतीला? आज त्याच नदीन सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख एकर शेती पाण्यात बुडवली आहे.
हीच अवस्था धाराशिव आणि बीड,जालना, नगर जिल्ह्यातील छोट्या नद्यांनी सातशे गावातील लोंकाची केली आहे. जीव मुठीत घेऊन जगायला लावलंय त्यांना. बीड, जालना, नगर, सोलापूर ते सातारा-सांगली पट्ट्यात कोरड्या दुष्काळाचे आगार असणारे अनेक तालुके आज ओल्या दुष्काळाच्या पुढे निघून गेले आहेत.
एका व्हिडिओत पहिले एका आजीचे सगळे घर पुरात वाहून गेले. पुढे ती सांगत होती या घरात आम्ही दोघीच राहायचो मी आणि माझी मुलगी. माझा मुलगा आणि या मुलीचा नवरा दोघेपण मेलेत, मुलीला पोरंबाळं पण नाहीत. रोजंदारी करून जगतोय आम्ही.... आता कुठं राहायचं?
तर दुसऱ्या एका व्हिडिओत पहिले, नेहमी तोऱ्यात बोलणाऱ्या एका माजी मंत्र्यांच्या जहागिरीत नदी राहायला आली होती. त्यांच्या दरातील फॉर्च्युनर पाण्यावर तरंगत होत्या.
निसर्ग वेळ आली कि गरीब श्रीमंत काही बघत नाही. पण मला नेहमी वाटत निसर्गपण स्वार्थी असतो श्रीमंतावर अन्याय करतो पण गरिबांवर तो ज्यास्तच अन्याय करतो. दारात बसून रडणारी आज्जी आणि शेतकऱ्याच्या गोठयात दाव्यासहित मेलेली जनावर पहिली कि निसर्गाच्या स्वार्थीपणाची अजूनच खात्री होते.
पण असो... येणारा काळ अजूनच अवघड असणार आहे. गावोगावची हीच अवस्था आज नहितर उद्या होणार आहे.
मागे एकदा कुठेतरी वाचले होते कोकणकड्यातील डोंगरातून वाहत येणाऱ्या नदीचा मार्ग बदलून त्यावरती एक मोठं विमानतळ राज्यात होतंय. भविष्यात ती नदी आपली वाट काढत आली तर? शंभर वर्षानंतर या पावसाळ्यात अशीच एक नदी सोलापूरमध्ये आपली वाट काढत अवतरली आहे. नदीच्या काठाला पिढ्यान पिढ्या गेलेल्या सोलापूरकरांना आता समजलं आपण नदीत राहत होतो. ९९.९९% सोलापूरकरांना या नदीचं नावसुद्धा माहित नाही.
नदी मांजरीसारखी असते आपली वाट कधी विसरत नसते.
निसर्गाला एवढपण कमी लेखून आपली लोभी साम्राज्यं उभा करता येत नाहीत आणि केलीच तर तो स्वतःच अस्तिव दाखवूनच देतो.
"जंगलात उभं राहिलेल्या मुंग्यांच्या एका वारुळानपण हत्तींना जंगल सोडावं लागत"
डॉ. नानासाहेब थोरात.
-
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
मुंबईकरांनो पाणी भरून ठेवा! 24 तासांचा 'मेगा वॉटर कट'; 50 हून अधिक भागांत पाणीपुरवठा ठप्प, वाचा यादी -
IPL 2026 csk schedule वेळापत्रक जाहीर; संजू सॅमसन चेन्नईत सामील, पाहा संपूर्ण शेड्युल! -
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध?






Click it and Unblock the Notifications