दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकारणात नेमकं काय चाललंय..?
Dilip Valse-Sharad Pawar meeting- नुकताच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यात महायुतीने जोरदार कमबॅक करत पुन्हा सत्ता मिळवली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक होतील का, या चर्चा सुरु झाल्या आहेत. आंबेगाव मतदारसंघाचे नूतन आमदार व पूर्वीचे शरद पवारांचे खंदे समर्थक, दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती, दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार का, या चर्चा यानिमित्ताने सुरु झाल्या आहेत.

वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट
महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेची लगबग सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील आले होते. तेथेच शरद पवार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठीच वाय. बी. चव्हाण सेंटरवर आले होते. आपण येथे शरद पवारांची भेट घेण्यासाठीच आलोय, असे त्यांनी स्वत: पत्रकारांना सांगितले. त्यानंतर एकच चर्चा सुरु झाली.
महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या भेटीला कशासाठी आले, याच्या चर्चा सुरु झाल्या. दिलीप वळसे पाटील यांच्या मनात नेमकं काय आहे? दोन्ही राष्ट्रवादींमध्ये काही वेगळं घडतंय का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्थात याबाबतच्या काही घडामोडी आगामी काळात घडतील तर ते स्पष्ट होईलच. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी दोन वाक्यात या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. "इथे मी पवार साहेबांची भेट घेणार आहे. काही नाही, फक्त नमस्कार करणार आहे. या भेटीत राजकीय चर्चा होणार नाही. फक्त प्रतिष्ठानची बैठक आहे. त्या बैठकीसाठी मी आलो आहे.", असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
आंबेगावात नेमकं काय झालं होतं.
दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावात निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे देवदत्त निकम होते. वळसे पाटील यांचा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे. मात्र तरीही देवदत्त निकम यांनी त्यांना टफ फाईट दिली. शरद पवार यांच्या पाठबळामुळेच या दोघांतील फाईट शेवटपर्यंत रंगली. शरद पवारांनी आंबेगावात सभादेखील घेतली. मतमोजणीच्या शेवटच्या घटकेपर्यंत सस्पेन्स राहीलाय. अखेर अटीतटीच्या या लढतीत दिलीप वळसे पटील यांचा निसटता विजय झाला. विशेष म्हणजे या मतदारसंघात पिपाणीमुळे तुतारीला फटका बसल्याचेही बोलले गेले. देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला 2965 मते मिळाली होती. त्यामुळेच वळसे पाटील-शरद पवार या भेटीला महत्त्व आले आहे.












Click it and Unblock the Notifications