विद्यमान आमदारांबाबतची नाराजी आणि महायुतीची विकासकामे, नेवाशात धनुष्यबाण चालणार?
Maharashtra Assembly Election 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघ ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान, देवगड देवस्थान याच तालुक्यात आहे. जगातील एकमेव मोहिनीराजाचे मंदीरही याच शहरात आहे. सहकाराचा तालुका म्हणून ओळख असलेल्या या नेवाशाची यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीचा इतिहास पाहता, येथे एक आमदार दोनदा निवडून आलेला नाही. यंदा या मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विठ्ठल लंघे, शिवेसना ठाकरे गटाकडून विद्यमान आ. शंकरराव गडाख आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून बाळासाहेब मुरकुटे अशी तिरंगी लढत होत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत अपेक्षित असताना या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. मात्र तरीही महायुतीच्या विकासकामांच्या जोरावर शेवटच्या क्षणी विठ्ठल लंघे हे बाजी मारतील, या शक्यताही वाढल्या आहेत.

सत्ताधाऱ्यांविरोधात राहणारा तालुका
अहिल्यानगर जिल्ह्यात बेभरवशाचा व प्रस्तापितांच्या विरोधात कौल देणारा तालुका म्हणून नेवासा विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघाने माजी खा. तुकाराम गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नरेंद्र घुले, विठ्ठलराव लंघे, मारुतराव घुले, आ. शंकरराव गडाख या सर्वांना एकेकदा पराभवाची धूळ चारली आहे. सत्ताधाऱ्यांचाही पराभव करणारा हा तालुका सोप्पा नाही.
मतदार राजा शेवटच्या क्षणी काय निर्णय घेईल, हे भल्याभल्यांना समजत नाही. त्यामुळेच यंदा विद्यमान आ. शंकरराव गडाख यांना ही निवडणूक सोप्पी नसल्याचे दिसत आहे. तसेही गेल्या पाच वर्षांच्या एककलमी कार्यपद्धतीमुळे, शंकराराव गडाख यांच्यावर जनता नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना विरोध नको म्हणून, अनेकजण पडद्यामागे राहून सुत्रे हलवताना दिसत आहेत. मतदारसंघाचा गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहता एकाच आमदाराला दोन टर्म सत्ता उपभोगता आली नाही. यावेळीही आ. गडाखांना ही निवडणूक सोप्पी नसल्याचे दिसत आहे.
विठ्ठल लंघेंमागे महायुतीची ताकद
विठ्ठलराव लंघे हे यापूर्वी राष्ट्रवादी व त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे तालुक्यात व एकंदर जिल्ह्याचा त्यांचा चांगला आभ्यास आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात व भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात त्यांनी अनेक विकासकामांना न्याय दिला. यंदाच्या निवडणुकीत या कामाची शिदोरी त्यांच्या उपयोगात येईल, अशी अटकल बांधली जात आहे. शिवाय यापूर्वी ते भाजप व राष्ट्रवादीत असल्याने तालुक्यातील या दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही तन-मन-धनाने त्यांचे काम करतील, अशी परिस्थिती आहे.
महायुतीची कोट्यवधींची कामे
या मतदारसंघात महायुतीने आपल्या सत्तेच्या काळात कोट्यवधींची विकासकामे केली. ज्ञानेश्वारीचे जन्मस्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर मंदिराचा विकासाला महायुती सरकारच्या काळात जोर आला. सुमारे 850 कोटींच्या विकासनिधीतून या तिर्थक्षेत्राचा विकास सध्या सुरु आहे. विकास आराखड्यात या मंदीराचा समावेश झाला असल्याने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हे काम तातडीने होण्याची चिन्हे आहेत. ज्ञानेश्वर मंदीराचे विकासकाम हे विठ्ठल लंघे यांच्यासाठी सकारात्मक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कापरी नाल्याने वातावरण फिरवले
सुमारे सहा-सात गावांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कापरी नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरु आहे. शिवसेनेचे माजी खा. सदाशिव लोखंडे यांच्या पुढाकारातून या कामासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटींचा निधी आला होता. शिवाय दुसऱ्या टप्प्यात दीड कोटींचा निधीतून खोलीकरणाचे काम झाले होते. या नाल्यामुळे जैनपूर, बेलपांढरी, बेलपिंपळगाव, घोगरगाव, सुरेगाव व पंचक्रोशित हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. हे काम महायुतीचे उमेदवार म्हणून विठ्ठल लंघे यांच्या फायद्याचे ठरणार आहे.
विश्वकर्मा लाभार्थीही ठरणार महत्त्वाचे
नेवासा तालुक्यातील सुमारे 12 हजार लाभार्थ्यांनी महायुती सरकारच्या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतला आहे. सरकारने तालुक्यातील 12 हजार कुटुंबाला उद्योग व्यवसायासाठी पुढे आणल्याने हे लाभार्थीही विठ्ठल लंघे यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय विमा योजनेचाही या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी दिलेली 13,600 रुपयांची मदत महायुती सरकारला फायद्याची ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदर विद्यमान आ. शंकरराव गडाख यांना ही निवडणूक सोप्पी नसल्याचे सध्यातरी दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications