कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण मी सोडून आणला; CM म्हणजे कॉमन मॅन : एकनाथ शिंदे
Chief Minister Eknath Shinde Jalna Sabha for Arjun Khotkar: जेव्हा अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार काम करत होते, समजू द्या लोकांना तुम्ही किती कामांना ब्रेक लावले. आमचे सरकार आल्यावर आम्ही सगळे ब्रेक काढून टाकले आणि विकासकामांना चालना दिली. अनेक मोठ्या प्रकल्पांना त्यांनी स्टे देण्याचे काम केले. तुम्ही बाळसाहेबांची शिवसेना तोडली, बाळासाहेबांना जे नको होते ते तुम्ही केले. कशासाठी? सत्तेसाठी. तुम्ही अनैसर्गिक युती केली खुर्चीसाठी. धनुष्यबाण तुम्ही कॉंग्रेसच्या दावणीला बांधला. मी तो सोडून आणला, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना येथे सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अर्जुन खोतकर यांची तुलना महाभारतातील अर्जुनासोबत केली, तर रावसाहेब दानवे यांना श्रीकृष्णाची उपमा दिली.

मराठवाडा कायम शिवसेनेचा लाडका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाडा कायम शिवसेनेचा लाडका राहिला आहे आणि मराठवाड्याचा एकच लाडका नेता राहिला आहे ते म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. अर्जुन खोतकर यांनी देखील त्यांची प्रेरणा घेत शिवसेना वाढवण्याचे अथक परिश्रम घेतले आहेत. अर्जुनाकडे चक्रव्यूव्ह भेदण्याची क्षमता आहे, त्याचा कोणी अभिमन्यू करू शकणार नाही. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना कृष्णाची उपमा दिली.
हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या मतदारसंघात पुन्हा एकदा श्रीकृष्णाचा, प्रभू श्रीरामाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. काल कोणीतरी म्हणत होते आमचा धनुष्यबाण चोरला, हे काय खेळणं आहे का? लहान पोरासारखे माझं हे चोरलं ते चोरलं. हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण एकदा सुटला की कुठे लागेल काही सांगता येत नाही.
खोतकर माझ्या खांद्याला खांदा लाऊन उभा
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे. या एकनाथ शिंदेने प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढा दिला आणि धनुष्यबाण सोडवून आणला. हा अर्जुन खोतकर सुद्धा माझ्यासोबत खांद्याला खांदा लाऊन उभा होता. तुम्ही सांगा जर हे सरकार आम्ही आणले नसते तर लाडकी बहीण सुरू झाली असती? मुलींना मोफत शिक्षण सुरू झाली असती? तीर्थदर्शन योजना सुरू झाली असती? उद्योग आले असते? गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात सुद्धा आपण विकास प्रकल्प सुरू केले.
पायाखालची वाळु सरकली अन् हे बडबडायला लागले
महाविकास आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना त्यांना फसवी आहे असे वाटले. पण जसे दोन हप्ते माझ्या लाडक्या बहीणींच्या खात्यात आले तेव्हा हे म्हणाले लवकर काढून घ्या नाहीतर हे सरकार पैसे काढून घेईल. नंतर म्हणाले महिलांना पैसे देऊन विकत घेता का? लाज कशी वाटली नाही या लाडक्या बहीणींचा अपमान करताना? आता म्हणत आहेत या सगळ्या योजनांची चौकशी लावणार. आम्ही चौकशीला घाबरतो का? आम्ही चळवळीमधून पुढे आलो आहोत. हा एकनाथ शिंदे कोणाला घाबरत नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे हे काहीपण बोलत सुटले आहेत.
सीएम म्हणजे कॉमन मॅन
खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची संस्कृती या महाविकास आघाडीची आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. पुढे ते म्हणाले, आज तुम्हाला मी सांगतो, या महायुतीने केलेले काम, एवढ्या कल्याणकारी योजना इतिहासात झाल्या नाहीत. मी सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन. मला सर्वसामान्य जनतेला पुढे न्यायचे आहे म्हणून मी या सगळ्या योजना आणल्या आहेत. लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये आपण देणार आहोत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवणार आहोत. तरुणांना आपण विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा विचार करणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत केली आहे तसेच जनतेच्या वीज बिलमध्ये आपण 30 टक्के मोफत केले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications