Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माजी मंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; वाचा त्यांचा जनसंघापासून भाजपपर्यंतचा राजकीय प्रवास!

Mahadeorao Shivankar Passes Away : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून आज (सोमवार, 20 ऑक्टोबर 2025) एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. जनसंघापासून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी वित्त व जलसंपदा मंत्री महादेवराव सुकाजी शिवणकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

सकाळी 8 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विदर्भ तसेच राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर आणि संजय शिवणकर यांच्यासह मोठा आप्त परिवार आहे.

mahadeorao shivankar passes away

संघाचे स्वयंसेवक ते कॅबिनेट मंत्री

महादेवराव शिवणकर यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. 7 एप्रिल 1940 रोजी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे त्यांचा जन्म झाला. एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एम.ए. (इतिहास) अशी उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मूळ शेतीत लक्ष देण्यापूर्वी भवभूती महाविद्यालय आमगाव येथे (नागपूर विद्यापीठाशी संलग्न) अर्थशास्त्र आणि इतिहासाचे व्याख्याता म्हणूनही काम केले.

संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि त्यानंतर जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. आणीबाणीच्या काळात (26 जुलै 1975) त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांचा सक्रिय राजकीय प्रवास 1978 ते 2008 या काळात निवडणुकीतील त्यांच्या अजिंक्य कामगिरीमुळे विशेष गाजला.

5 वेळा आमदार, एकदा खासदार आणि कॅबिनेट मंत्री

महादेवराव शिवणकर यांनी आमगाव विधानसभा मतदारसंघाचे तब्बल पाच वेळा (1978, 1980, 1985, 1995, 1999) प्रतिनिधित्व केले. याशिवाय, ते दोन वेळा संसदेचे सदस्य राहिले. 1989 ते 1994 पर्यंत आणि पुन्हा 2004 ते 2008 पर्यंत त्यांनी चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्यकाळ सांभाळला.

राज्याच्या राजकारणात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाची पदे भूषवली. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, 1995 ते 1997 या कालावधीत त्यांनी जलसंपदा (सिंचन) मंत्री आणि त्यानंतर 1997 ते 1999 या काळात वित्त व नियोजन मंत्री म्हणून राज्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला.

विदर्भ विकासात मोठे योगदान

गोंदिया जिल्ह्याच्या विकासात त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार यांसारखे महत्त्वाचे सिंचन प्रकल्प साकारले, ज्यामुळे गोंदियातील शेतकरी विकासाला मोठी गती मिळाली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 'भारतरत्न' देण्याची मागणी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल त्यांना विशेष आदर होता. 2004 मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर त्यांनी संसदेत पहिल्यांदाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी केली होती.

ज्येष्ठ नेते महादेवराव शिवणकर यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाने एक समर्पित आणि अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सिंचन क्षेत्रात कायम राहील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+