धक्कादायक 2024..! दोनाचे चार झाले, चाराचे झाले सहा; दोन निवडणुकांचे दोन परिणाम
महाराष्ट्राच्या राजकारणात 2024 ला बरीच उलथापालथ झाली. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांचे चार पक्ष झाले. तिकडे युती व आघाडीच्या चार प्रमुख नेत्यांभोवती राजकारण फिरत होते. मात्र त्यानंतर युती व आघाडीत मिळून चाराचे सहा पक्ष झाले, आणि त्या सहा नेत्यांच्या भोवती राजकारण फिरु लागले. या सहा नेत्यांनी दोन लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुका गेल्या वर्षी लढवल्या. मात्र या दोन्ही निवडणुकांचे परिणाम अगदीच विरुद्ध लागले. काय घडले वर्षभरात..? याच विषयाचा हा मागोवा...

राष्ट्रवादीची दोन शकले
राष्ट्रवादीत अजित पवार गटाने सख्खे काका शरद पवारांविरोधात जुलै २०२३ मध्ये बंड केले. फेब्रुवारी २०२४ ला निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिकृत पक्ष बनला. अजित पवारांना पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडाही मिळाला. यावर्षीच अजित पवार राष्ट्रवादीचे अधिकृत अध्यक्ष बनले.
लोकसभेला तीन-तीन पक्षांत लढत
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनीही शिवसेनेचे दोन तुकडे केले होते. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीचे दोन पक्ष केले. या वर्षाच्या मध्यावर म्हणजेच एप्रिल-मे मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीत सहा पक्षांनी दंड थोपाटले. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गट अशा तीन-तीन पक्षांत लढत झाली.
लोकसभेला मविआची जादू
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीला भाजपला जबाबदार धरले. विशेष म्हणजे, भाजपचा कारनामा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकांपर्यंतही पोहोचववला. त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. त्याऊलट महायुतीतील भाजपला ९, शिवसेना शिंदे गटाला ७ तर अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली.
विधानसभेला सगळंच बदललं
लोकसभेचा फटका बसलेल्या महायुतीने मतदारांच्या नाराजीची कारणे शोधली. त्यानंतर महायुतीने घोषणांचा पाऊस पाडला. लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, मोफत शिक्षण, महिलांना ५० टक्के सवलतीत प्रवास, कृषिपंपाची वीज मोफत अशा घोषणा केल्या गेल्या. २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान झाले, आणि निकालानंतर सगळेच वातावरण बदलले. सहा महिन्यांपूर्वी ज्या मतदारांनी मविआला हवेत नेले होते, त्याच मतदारांनी त्यांना पुन्हा जागेवर आणले.
महायुतीची घोडदौड
खऱ्या- खोट्या शिवसेनेचा मुद्दा, खऱ्या-खोट्या राष्ट्रवादीचा मुद्दा, अदानी प्रकरण, संविधान बदलाचा मुद्दा, जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा, मराठा आरक्षण या सगळ्या मुद्यांना महायुतीने उत्तमरित्या तोंड दिले. निकालानंतर भाजपने १३२, शिवसेना शिंदे गटाने ५७, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या. विरोधी महाविकास आघाडीला तिन्ही पक्ष मिळून अर्धशतकही करता आले नाही. शिवसेना यूबीटीला २०, काँग्रेसला १६ तर राष्ट्रवादी एसपीला १० जाागंवर समाधान मानावे लागले.
वर्षाअखेरीस नवा मुख्यमंत्री
वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत म्हणजेच डिसेंबरमध्ये, महाराष्ट्रात सत्तेचा खेळ रंगलेला दिसला. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गट अडून बसला. मात्र भाजपने १३२ जागा जिंकल्याने हे पद अखेर भाजपकडेच राहिले. निकालानंतर तब्बल १० दिवस तू-तू मै-मैचा खेळ रंगला. अखेर पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. अजितदादा विक्रमी सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ठरले.
मंत्रीमंडळाबाबतही बसले धक्के
मुख्यमंत्रीपदावरुन महाराष्ट्रात रंगलेला सत्तासंघर्ष मंत्रीमंडळापर्यंत राहिला. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी अनेक धक्कादायक चेहऱ्यांना यावेळी थांबवले. भाजपकडून सुधीर मुनगुंटीवार, अजित पवार गटातून छगन भुजबळ, शिवसेनेतून दीपक केसरकर, असे चेहरे यावेळी मंत्रीमंडळातून बाहेर काढलेले दिसले. दुसरीकडे खातेवाटपाबाबतही चांगलीच गरमागरमी झाली. अखेर तिन्ही नेत्यांनी खातेवाटपात एक पाऊल मागे घेत, वर्षाअखेरीस तेही पूर्ण केले.












Click it and Unblock the Notifications