कल्याण-डोंबिवलीत'मॅच फिक्सिंग'? ठाकरेंच्या नेत्यामुळेच BJP-शिंदेसेनेचे 20 उमेदवार बिनविरोध?
KDMC Election 2026 :राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून मतदानापूर्वीच राजकीय वातावरणात मोठा भूकंप झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) महायुतीचे तब्बल 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, या विजयामागे भाजपची रणनीती नसून चक्क ठाकरे गटातील (शिवसेना UBT) अंतर्गत 'सेटिंग' कारणीभूत असल्याचा धक्कादायक आरोप होत आहे.
एका व्हायरल ऑडिओ क्लिपने या संशयाला अधिक बळ दिले असून, ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनीच आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचे समोर येत आहे.

लोकशाहीचा गळा आवळला? ७० नगरसेवक बिनविरोध
राज्यातील विविध महापालिकांमध्ये मतदानापूर्वीच ७० नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये 'केडीएमसी'मध्ये सर्वाधिक २० उमेदवार (भाजप १४, शिंदे सेना ६) बिनविरोध विजयी झाले आहेत. पालिकेत बहुमतासाठी ६१ हा आकडा आवश्यक असताना, मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा एक तृतीयांश पल्ला गाठला आहे.
ठाकरे गटातच 'बिभीषण'?
भाजप आणि शिंदे गटाने पैशांचा पाऊस पाडून उमेदवार बसवल्याचा आरोप विरोधक करत असतानाच, कल्याण-डोंबिवलीत वेगळेच चित्र समोर आले आहे. ठाकरे गटाचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष तात्या माने यांनीच पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार वैशाली पोटे यांनी केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये तात्या माने आणि वैशाली पोटे यांच्यातील संवाद स्पष्ट ऐकायला येत आहे.
तात्या माने: "पक्षाचा आदेश आहे, उमेदवारी मागे घ्या. काही गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात."
वैशाली पोटे : "असं कसं होऊ शकतं?"
तात्या माने : "वरच्या लेव्हलला काय गणितं ठरलीत, आपल्याला काय माहिती? तुम्ही हवं तर वरुण सरदेसाई यांच्याशी बोलून घ्या."
पक्षादेश की वैयक्तिक 'सेटिंग'?
या ऑडिओ क्लिपने संपूर्ण ठाकरे गटात खळबळ उडवून दिली आहे. जिल्हाध्यक्ष स्वतःच उमेदवारांना "वरचा आदेश" सांगून अर्ज मागे घ्यायला लावतात, याचे अर्थ राजकीय जाणकार दोन प्रकारे काढत आहेत.
एक तर ही महायुतीसोबतची पडद्यामागची गुप्त युती आहे, किंवा नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी महायुतीला पूरक भूमिका घेतली आहे. या दबावामुळे अनेक ठिकाणी महायुतीचे मार्ग सुकर झाले असून, विरोधकांचे आव्हान मतदानापूर्वीच संपुष्टात आले आहे.
आता लक्ष मातोश्रीच्या भूमिकेकडे
वैशाली पोटे यांनी दबावापुढे न झुकता आपला अर्ज कायम ठेवला असला, तरी अनेक प्रभागांत अशी 'सेटिंग' यशस्वी झाल्याची चर्चा आहे. "आमचा शत्रू बाहेर नाही तर घरातच आहे," अशा भावना निष्ठावान कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.
या गंभीर आरोपानंतर आता उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या प्रकरणावर काय भूमिका घेणार? तात्या माने यांच्यावर कारवाई होणार की हे 'वरचे आदेश' नेमके कुणाचे होते, याचे गुपित उघड होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications