सिन्नरचा जन्म, गिरणी कामगाराचा मुलगा ते ठाण्याचा बुलंद आवाज; जितेंद्र आव्हाडांचा राजकीय प्रवास!
महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे, वादळी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, जनसेवा आणि सातत्य यांचा मिलाफ आहे. सिन्नरच्या एका सामान्य गिरणी कामगाराच्या मुलाने मुंबईच्या विद्यापीठापासून थेट मंत्रालयापर्यंत मजल कशी मारली, याचा हा वेध आणि सध्या सुरु असलेल्या त्यांच्या नव्या वादामुळे ते पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.

विधिमंडळात 'आव्हाड-पडळकर' रणकंदन: चर्चेतील ताज्या घडामोडी
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच, आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. बुधवारी (July 16) विधानभवनाच्या परिसरात पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाडांच्या कार्यकर्त्याला (धनंजय देशमुख) लागल्याचा आरोप झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर गुरुवारी (July 17) या वादाने गंभीर वळण घेतले. विधानभवनाच्याच लॉबीमध्ये आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, विधानमंडळाच्या आवारातच असा प्रकार घडल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करत, "मला मारण्याचा हा डाव होता. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर आम्ही कशाला आमदार राहायचं?" असा सवाल केला. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील शिवीगाळ करणारे मेसेजेस आल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेनंतर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या परिसरात ठिय्या आंदोलनही केले. तर दुसरीकडे, गोपीचंद पडळकर यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले असून, याबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचे नमूद केले. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
बालपण आणि संघर्षाचे धडे
जितेंद्र आव्हाड यांचा जन्म मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ता गावचा. दुष्काळामुळे त्यांचे वडील सतीश आव्हाड ठाण्यात स्थलांतरित झाले आणि गिरणी कामगार म्हणून त्यांनी काम केले. वडिलांनी कामगारांसाठी दिलेल्या लढ्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोलवर परिणाम केला आणि त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात पाऊल ठेवले.
युवक काँग्रेस ते राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व
1980-81 मध्ये ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस, तर 1987-88 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. 1988-93 दरम्यान ते एन.यु.एस.आय. (NUSI) विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. 1993-98 या काळात त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत दोन दशके सक्रिय राहिल्यानंतर, 1999 मध्ये त्यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे नेतृत्व केले.
विधानपरिषद ते विधानसभेची चौथी टर्म
2002 आणि 2008 मध्ये ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा पारंपरिक बालकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. राजन किणे यांना 15 हजारांहून अधिक मतांनी पराभूत करत त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2014,2019 आणि 2024 मध्येही त्यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला, विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढतच गेले.
मंत्रिपदाची धुरा आणि महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या
केवळ आमदार म्हणूनच नव्हे, तर जितेंद्र आव्हाड यांनी दोनदा मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. 2014 मध्ये ते राज्याचे फलोत्पादन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक विकास मंत्रिपद मिळाले. याशिवाय, 2008-09 मध्ये विधान परिषदेत राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद, तर 2014-19 दरम्यान विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
मतदारसंघाचा विकास आणि जनसंपर्क:
राजकीय वर्तुळात अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असले तरी, मुंब्रा-कळवा मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांची लोकप्रियता कायम आहे. रेल्वे स्थानकाचा विकास, रस्त्यांचे रुंदीकरण आणि धार्मिक सलोखा राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नाशिक जिल्ह्यातील नातेवाईक आणि वंजारी समाजाशी असलेले त्यांचे घट्ट नाते, हे त्यांच्या राजकीय ताकदीचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.
शरद पवारांचा विश्वासू शिलेदार
जितेंद्र आव्हाड यांना शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाते. "एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकला, तो फक्त शरद पवार यांच्यामुळेच," असे ते अनेकदा बोलून दाखवतात, यातून पवारांवरील त्यांची निष्ठा दिसून येते.
एकंदरीत, विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रिय असलेल्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा प्रवास हा एका सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास आहे. सध्या सुरु असलेला वाद हा त्यांच्या राजकीय प्रवासातील एक नवीन अध्याय ठरत आहे. त्यांच्या या 'राजमार्गा'वर भविष्यात आणखी कोणती वळणे येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications