बारामतीतूनच लढतील, पण सहानुभूतीसाठी अजित पवारांचे राजकारण; जितेंद्र आव्हाडांनी घेतला दादांचा समाचार
Jitendra Awhad on Ajit Pawar : बारामतीत आता मी नको दुसरा कोणीतरी आमदार पाहिजे, म्हणजे तुम्हाला माझ्या अन् नवीन आमदाराच्या कामातील तुलना कळेल, असे विधान अजित पवार यांनी केले. तर निवडणूक न लढण्याचे अप्रत्यक्षपणे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
त्यावर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधत दादांना जोरदार टोला लगावला. बारामतीचा खरा विकास पवार साहेबांनीच केल्याचा दावा त्यांनी केला. तर अजित पवार हे लोकांच्या मानसिकतेशी खेळून राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर खोचकपणे टोला लगावला. आव्हाड म्हणाले की, मुळात अजित पवार बारामतीमधून लढणार आहेत, लोकांची मानसिकता संभ्रावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत आहेत. आपल्याप्रती लोकांची सहानभूती कशी निर्माण होईल यासाठी सर्व प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचा दावा देखील आव्हाड यांनी केला.
माझ्यामुळे बारामतीचा विकास, हा दादांचा संभ्रम
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार देशाचे विरोधी पक्ष नेते होते. शरद पवार उच्चपदस्थ राजकारणी होते. त्यामुळे कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असं ते सगळे पवार साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते. असे जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यामुळे बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे, बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे, या गैरसमजातूनच ते मागे पडले, असा टोला आव्हाड यांनी अजित पवार यांना लगावला.
दादा तुमचं राजकारण लोकांना आवडतं नाही
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांची ताकद काय असते हे दादांना ते मुख्यमंत्री न झाल्यामुळे अजून त्यांना कदाचित कळली नसेल. आम्ही एकनाथ शिंदे यांचा अनुभव घेत आहे, ते सुद्धा घेत आहेत. अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावे लागते. वडीलधाऱ्या माणसाचे अपमान करणे, पाडून बोलणे, वडीलधाऱ्या माणसाची मृत्यूची इच्छा व्यक्त करणे हे लोकांना मुळीच आवडतं नाही.

सर्व बारामतीला माहितीये बॉस कोण?
आव्हाड म्हणाले की, अजित पवार काम करत नाही का? काम करतात. मात्र, काकांना बाहेर काढावं हे लोकांना आवडत नाही. सर्व बारामतीला माहिती बॉस कोण आहे. कामाशिवाय देखील आपलं नातं असतं. कुठलीही विधानसभा ही भवितव्याची निवडणूक असते. महाराष्ट्र भवितव्य कोण देणार हे सर्वांना माहिती आहे. पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला, राजकीय करामती केल्या तुम्ही. एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल, तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणला आहे, असे म्हणत आव्हाड यांनी दादांना चांगलेच फैलावर घेतले.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता 65 वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. 'एकच दादा अजित दादा' अशा घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जिथे पिकतं तिथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा. जिथं पिकतं तिथं विकत नसतं. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली असेही दादा म्हणाले.
पूर्वीचे अन् आत्ताचे कामं पाहा
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. 91 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. आता बारामती शहर सोडून साडे सातशे कोटीच्या योजना सुरू आहेत. पूर्वी बारामतीचे रस्ते बघितले आहेत. आताचे रस्ता बघा. काही राहिले असेल तर तेही मी मान्य करतो. कसे करायचे ते त्याचाही विचार करू. न मागता मेडिकल कॉलेज मिळालं. या मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवीचं नाव देणार आहोत. तर आयुर्वेदिक महाविद्यालय आणणार आहोत.












Click it and Unblock the Notifications