विशाळगडावरील दंगल सरकारने घडवली! 'या' नेत्याचा गंभीर आरोप
विशाळगड येथे 14 जुलै रोजी अतिक्रमण हटवण्यासाठी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र अचानक बाहेरील दंगलखोर आले आणि दंगल करीत लूट मार केली. ही दंगल सरकारनेच घडवून आणली, असा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
या संदर्भातील खूप सारे पुरावे 29 तारखेला समोर येतील असा दावा देखील आव्हाड यांनी केला आहे. विशाळगढ घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात अशांतता पसरली होती.

अमित शहांनी आरशात बघावे
पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवार पवार हे राजकारणातील भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत अशी टीका केली होती त्यावर देखील आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे; आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग, समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ते सांगावे.
ईडी, सीबीआय वापरून पक्ष कसे फोडले, 70 हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता अन् सध्या ते कुठे आहेत? हे त्यांनी जाहीर करावे. शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपले अस्तित्व दाखवता येत नाही, हे अमीत शहा यांनाही उमगले आहे. याच शहा यांनी इलेक्ट्रोल बाँड, सीबीआय यावरही कधीतरी बोलावे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हे कसले शिवभक्त? हे तर दरोडेखोर
विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबतही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी शासन - प्रशासनाला खडे बोल सुनावले. स्थानिकांनी तहसीलदार, पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला अन् त्यानंतर गजापूरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लूटमार केली.
विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदीशेजारी मुक्काम केला होता. अन् त्यांच्या नावाने दंगल पसरविली जात आहे. ही दंगल पसरवणारे कसले शिवभक्त ते तर दरोडेखोर आहेत.
पवारांनी जातीपातीचे राजकारण कधीच केलं नाही
आरक्षणाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेत आहेत, याबाबत विचारले असता, शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व नेते आहेत. ते मानव हिताचे राजकारण करीत आले आहेत. पवारांनी जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. पण, गेले दोन वर्षे या सत्ताधाऱ्यांनी दोन जाती एकमेकांशी भिडवल्या. त्यात यश न आल्याने त्यांनी आता हिंदू-मुस्लीम दंगल भडकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले












Click it and Unblock the Notifications