छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण : जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ, चेतन पाटीलला दिलासा
Jaydeep Apte : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. या प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला अटक करण्यात आल्यानंतर फरार शिल्पकार जयदीप आपटेलाही आठ दिवसांनी अटक करण्यात आली. आज त्या प्रकरणी सिंधुदुर्ग मधील न्यायालयात सुनावणी झाली. जयदीप आपटेला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर चेतन पाटीलला न्यायालय कोठडी सुनावण्यात आली.
राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी पहिल्यांदा चेतन पाटील त्यानंतर जयदीप आपटे याला अटक केली होती. आज दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. आजच्या सुनावणीसंदर्भात सरकारी वकील ॲड. तुषार भणगे यासंदर्भात माहिती दिली आहे.

ॲड. तुषार भणगे म्हणाले की, आरोपी जयदीप आपटे विसंगत माहिती देत आहे .त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती,परंतु न्यायालयाने 13 तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. जयदीप आपटे याच्याकडून पोलिसांना अधिक माहिती मिळवायची आहे. या प्रकरणातील इतर व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळवायची असल्यानं सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. या प्रकरणात तपासकाम करणं गरजेचं असल्यानं न्यायालयानं आमचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नवीन कायद्यानुसार पोलिसांना जेव्हा हा आरोपी हवा असेल त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीने पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात असंही भणगे म्हणाले.
आठ महिन्यांपूर्वी राजकोट किल्ल्यावर पुतळ्याची उभारणी
आठ महिन्यापूर्वी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. या 26 ऑगस्ट रोजी हा 28 फुटी ब्राँझचा पुतळा कोसळला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटील याला ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. सिंधुदुर्ग पोलिसांनी चेतन पाटील यांना अटक केली होती. जयदीप आपटे हा एक आठवडा फरार होता. तो घरी असल्याचे समजताच कल्याणमधील घराबाहेर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली होती.
पुतळा दुर्घटना प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते आशिष शेलार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली होती. राजकोट किल्ल्यावर जो पुतळा उभारण्यात आला होता त्याच्या उभारणीत घाई झाल्याचा तसेच पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला होता.












Click it and Unblock the Notifications