नागपूर एअरपोर्टवर बालंबाल बचावले 272 प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं! वारंवार असेच का होते?
IndiGo Emergency Landing : मंगळवारी नागपूरहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला एका मोठ्या अपघातातून वाचवण्यात आले. टेकऑफ होताच हवेत एका पक्ष्याशी टक्कर झाल्याने विमानात मोठा गोंधळ उडाला. मात्र, वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे 272 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचे प्राण वाचले आणि विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग झाले.
नेमके काय घडले?
मंगळवारी (2 सप्टेंबर) नागपूर विमानतळावरून इंडिगोचे फ्लाइट क्रमांक 6E812 कोलकाताकडे उड्डाण घेत होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान एका पक्ष्याशी धडकले.
या धडकेमुळे विमानाचा पुढचा भाग खराब झाला आणि विमानातील प्रवाशांमध्ये अचानक घबराट पसरली. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, वैमानिकाने कोणताही वेळ न घालवता तातडीने विमान नागपूर विमानतळावर परत आणण्याचा निर्णय घेतला आणि सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग केले.

5 दिवसांतली दुसरी घटना!
5 दिवसांत इंडिगोच्या विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची ही दुसरी घटना आहे. 5 दिवसांत इंडिगोच्या विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची ही दुसरी घटना आहे. 28 ऑगस्ट रोजी सुरतहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता सुरत विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या फ्लाइट क्रमांक 6 ई-1507 ने उड्डाण केले. काही तांत्रिक समस्येमुळे विमानाला अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर उतरवावे लागले.विमानात 150 प्रवासी होते. जेव्हा पायलटला इंजिनमध्ये काही समस्या जाणवली तेव्हा विमान समुद्राच्या पलीकडे होते.
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली माहिती
नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबिद रुही यांनी सांगितले की, "इंडिगोच्या या विमानात पक्षी धडकल्याचा संशय आहे आणि या घटनेची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. इंडिगोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, खबरदारी म्हणून वैमानिकांनी विमान परत आणण्याचा निर्णय घेतला. सध्या विमानाची तपासणी आणि दुरुस्ती केली जात असल्यामुळे आजचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे."
'पक्षी धडक' एक गंभीर आव्हान
विमान वाहतूक तज्ञांच्या मते, टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी पक्षांची धडक विमानासाठी एक गंभीर धोका आहे. यामुळे इंजिनला किंवा इतर महत्त्वाच्या भागांना मोठे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
2 जून रोजी रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातही अशीच घटना घडली होती, तेव्हाही सर्व 175 प्रवासी सुरक्षित होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा वैमानिकांच्या कौशल्याचे आणि त्यांच्या समयसूचकतेचे महत्त्व सिद्ध झाले आहे.












Click it and Unblock the Notifications