..तर राज्यातील लोकांना कुत्र्याच मटण खावं लागेल; भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
Gopichand Padalkar : धनगर समाज बांधवांमुळे राज्यातील सर्वांना बकऱ्याचं मटन मिळते. राज्यातील धनगरांनी बकरी राखायची बंद केली तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटन खावं लागेल, असे वादग्रस्त विधान भाजप नेते तथा आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला भेट दिल्यानंतर पडळकर यांनी हे वादग्रस्त विधान केले.

गोपिचंद पडळकर यावेळी बोलताना म्हणाले की, मला आमदारकी सह जे काही मिळाले आहे. त्या मागे माझा धनगर समाज आहे.आमचे मेंढपाळ वर्षभर घरी येत नाहीत. आमची मुलं सगळ्यांच्या पाठी फिरतात. आम्हाला गुरासारखं मारलं जातंय. पण हे आम्ही किती दिवस सहन करायचे.
रास्ता रोकोमुळे वाहतुकीचा खोळंबा
शहरातील तावडे हॉटेल परिसरात सकाळी 11 वाजता सुरू झालेलं आंदोलन 12 वाजेपर्यंत सुरू राहिलं. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. या आंदोलनात धनगर समाजाने बकरी देखील रस्त्यावर आणली होती. त्यामुळे, काही काळासाठी वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे हाल झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्यभरात धनगर बांधवांचे आंदोलन
नाशिक, पंढरपूर, कोल्हापूर, अकोल्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं आहे. परळी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी केलेल्या रस्ता रोकोमुळे काही काळ परळी-बीड आणि परळी-परभणी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे, या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला.
जरांगे यांच्यावरही साधला होता निशाणा
भाजप नेते गोपिचंद पडळकर हे कायमच वादग्रस्त विधान करण्यात चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील हल्लाबोल केला होता. जरांगे हे मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करत आहेत. वास्तविक मागणी सोडून जरांगे हे त्यांच्या उपोषणातून राजकारण आणत असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला होता.
शरद पवारांवर सातत्याने टीका
शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे," अशा शब्दांत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. जसा बाप तशी बेटी असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला होता.












Click it and Unblock the Notifications