'उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले', राज ठाकरेंना नाचता येईना; भाजप नेत्याचा गंभीर आरोप!
Girish Mahajan Attacks Uddhav Thackeray : राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरेंनी लोकांमध्ये न जाता, केवळ 'मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे' काम केल्याचा गंभीर आरोप महाजन यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे 'दगाबाजी' करून सत्तेत
उद्धव ठाकरेंना त्यांच्या बडबडीवरून आणि टीका करण्यावरून लक्ष्य करताना महाजन यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उभे केले. महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी इतरांना 'बोगस' म्हणण्याऐवजी आधी आत्मपरीक्षण करावे.
"तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरेतर लोकांनी तुम्हाला दिले नाही, तुम्ही दगाबाजी करून ते (सत्ता) घेतले," अशी थेट टीका महाजन यांनी केली.

कोरोना काळातील कामगिरीवर प्रहार
"अडीच वर्षांमध्ये तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही घराच्या खाली उतरले नाहीत. डेड बॉडीमध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले, किती लोक त्यामध्ये जेलमध्ये आहेत," असा गंभीर आरोप करत, "कोरोना काळात मराठी माणसासाठी तुम्ही काय केले? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले," असे महाजन म्हणाले.
मराठा आरक्षणावर काँग्रेसला लक्ष्य
मराठा आरक्षणावरून बोलताना गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारवर अपयशाचा ठपका ठेवला.
देवेंद्र फडणवीस यांनीच सर्वात पहिले मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले आणि आरक्षणाबाबत वाचा फोडली, असे महाजन म्हणाले.
"इतक्या वर्षांपासून आपल्या आरक्षणाची मागणी असताना कुठल्याही सरकारने आपल्या पदरात काही टाकलं नाही. ते फक्त देवेंद्र फडणवीस होते."
आरक्षण न टिकण्याचे कारण: "दुर्दैवाने (ते आरक्षण) कोर्टात टिकले नाही हा भाग वेगळा आहे. आणि दुर्दैवाने आमचे सरकार बदलले, त्यामुळे तत्कालीन काँग्रेसचे सरकार ते कोर्टात टिकवू शकले नाही, त्यात आमचा दोष नाही," असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर जबाबदारी ढकलली.
जरांगेंना जिभेवर संयम ठेवण्याचा सल्ला
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. "फडणवीस हे खुणशी आहेत असे म्हणण्याला काही अर्थ नाही, या वक्तव्याला कोणीही साथ देणार नाही," असे महाजन म्हणाले.
जरांगे पाटील यांनी आपल्या जिभेवर संयम ठेवला पाहिजे. मागण्या रास्त मार्गाने मांडल्या पाहिजेत. "मागच्या वेळी त्यांचा बोलण्याचा स्तर इतका खाली गेला होता की लोकांनाही कंटाळा आला होता," असा सल्ला महाजन यांनी जरांगे पाटील यांना दिला.
राज ठाकरेंना 'नाचता येईना अंगण वाकडे' टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन यांनी 'नाचता येईना अंगण वाकडे' या म्हणीचा वापर केला. बेस्ट निवडणुकीत मतदान यंत्रात गडबड झाल्याच्या आरोपांवरून महाजन म्हणाले की, राज ठाकरे जो 'मराठी माणूस' सांगावा करत आहेत, त्यानेच त्यांना मतदान केले नाही. "तुम्ही जो मराठी माणूस मराठी माणूस सांगावा करत आहात त्याला कोणी मतदान केलं? शून्य सुद्धा फोडता आला नाही."
"कधी मतपेट्या खराब झाल्या, कधी बॅलेट पेपर तर कधी मतदार याद्या खराब झाल्या असं तुम्ही म्हणायचे. लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि मग तुम्ही प्रत्येक वेळी नवीन नवीन कारण शोधायचे," असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले.
राहुल गांधी आणि 'नाटक' बंद करा
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांना, विशेषतः राहुल गांधींना, महाजन यांनी आव्हान दिले.
"जनता जनार्दन सर्वात मोठा आहे, तुम्ही निवडणुकीला समोर जा, आता महापालिकेच्या निवडणुका आहेत मग कशाला रडत बसताय."
लोकसभेत मोठे मताधिक्य मिळाले तेव्हा भाजप रडला नाही, असे सांगत महाजन म्हणाले, "तुमचे सरकार त्यावेळी होते त्यावेळी मतपेट्या, मतदान याद्या खराब केल्या असे आम्ही रडलो नाही."
"आधी म्हणतात मशीन खराब आहे, आता म्हणतात याद्या खराब आहेत. लोकसभेच्या याद्याच विधानसभेमध्ये होत्या. हे नाटक बंद करा, लोक तुम्हाला आता स्वीकारायला तयार नाहीत," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.












Click it and Unblock the Notifications