'जय गुजरात'चा नारा,राज ठाकरेंना व्यापाऱ्याची धमकी; मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान
मुंबईसह राज्यभरात सध्या मराठी विरुद्ध हिंदी वाद पुन्हा एकदा चांगलाच तापला असताना, मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं आहे. येथील जोधपूर स्वीट्स अॅण्ड फरसाणचे मालक बाबूलाल चौधरी यांना मराठी न वापरल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाषेवर अभिमान बाळगणे चुकीचे नाही, पण भाषेच्या नावाखाली हिंसाचार किंवा गुंडगिरी कदापिही सहन केली जाणार नाही. त्यांनी याच घटनेतील आरोपींविरोधात एफआयआर दाखल झाल्याची माहिती दिली.
मराठीचा अभिमान योग्य, पण जबरदस्ती अयोग्य - फडणवीसांचा संताप
फडणवीस पुढे म्हणाले की, "कोणतीही भाषा शिका, तीचा अभिमान बाळगा, पण ती दुसऱ्यावर लादू नका. मुंबईसारख्या महानगरात जर भाषा न आल्यामुळे एखाद्याला मारहाण केली जात असेल, तर ती गोष्ट कोणत्याही सुसंस्कृत समाजात मान्य केली जाणार नाही."
ते पुढे म्हणाले, "आज एखादा मराठी व्यक्ती आसाममध्ये व्यापार करत असेल आणि त्याला स्थानिक भाषा शिकायला वेळ लागत असेल, तर तिथे त्याला हाणामारी सहन करावी लागली पाहिजे का? हीच गोष्ट आपण समजून घ्यायला हवी."
ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
भाषेच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. त्यांनी म्हटलं, "त्रिभाषा सूत्राचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. तो ठाकरेंच्याच सरकारकडून घेतला गेला होता. समिती स्थापन करणं, निर्णय कॅबिनेटमध्ये मांडणं, हे सर्व त्यांच्याच कार्यकाळात घडलं होतं."
फडणवीस म्हणाले, "आम्ही सध्या नव्या समितीकडून अहवालाची वाट पाहत आहोत. जो निर्णय होईल, तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल. पण त्याआधी जो काही भाषा दुराग्रहातून हिंसाचार केला जातोय, त्यावर कडक कारवाई होणार आहे."
'जय गुजरात'वरून नवा वाद? - फडणवीसांचा बचावात्मक दृष्टिकोन
पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'जय महाराष्ट्र, जय गुजरात' अशी घोषणा दिल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात त्या समुदायाच्या गौरवासाठी काही शब्द बोलणे गैर नाही. पूर्वी शरद पवार यांनी कर्नाटकमध्ये 'जय कर्नाटक' म्हटले होते, त्याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली."
केडिया प्रकरणावर थेट टीका
मीरा-भाईंदर घटनेतील व्यापारी सुशील केडिया यांच्या विधानावरही फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. "मराठी येत नसेल तर ठीक, पण मी शिकणारच नाही अशी उद्धटपणे भूमिका घेणं अयोग्य आहे. त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही," असं म्हणत त्यांनी या प्रकरणातील दोन्ही बाजूंना फटकारलं.
मराठीतून प्रेम करा, पण इतरांवर लादू नका - मुख्यमंत्री फडणवीसांचा संदेश
"मराठी भाषा आपली अस्मिता आहे, तिचा सन्मान होलाच. पण भाषेवरून इतरांवर अन्याय करणं योग्य नाही. हिंसा, धमकी, जबरदस्ती किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती ह्यांचा भाषेशी काही संबंध नाही. हेच आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे," असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला.












Click it and Unblock the Notifications