"दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना विधानभवनातून इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवनात मुंबई आणि विकासकामांवर बोलताना नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काही लोकांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे प्रश्न उपस्थित केले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे कामे थांबल्याचे म्हटले गेले, मात्र आपण राज्यघटना मानतो आणि त्यानुसारच कामे करावी लागतात असे शिंदे म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या निर्देशामुळे होऊ शकल्या नाहीत. ओबीसी आरक्षणही महत्त्वाचे असून सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार निवडणुका होतील. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको होत्या, असेही ते म्हणाले.
शिंदेंनी यावेळी मुंबई महानगरपालिका आणि मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना टोला लगावला. मिठी नदीतील गाळाच्या मुद्द्यावरून दिनो मोरियाला हे कंत्राट का दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होणार," असा इशारा देत शिंदेंनी ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.
मुंबईकरांसाठी विकासकामे अग्रस्थानी
निवडणुका झाल्या नसल्या तरी कोणतेही काम थांबले नसल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. मुंबईत बदल होत आहे, हे छातीवर हात ठेवून सांगण्याचे आवाहन त्यांनी केले. "मुंबईकर आमच्यासाठी फर्स्ट आहेत, इतरांसाठी कंत्राटदार फर्स्ट आहेत," असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण आयुक्तांना बोलावून खड्डेमुक्त मुंबईसाठी दोन टप्प्यांत रस्ते करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
पहिला टप्पा पूर्ण झाला असून काँक्रिटीकरणामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये $1.5 ट्रिलियन डॉलरची क्षमता असल्याचे ते म्हणाले. "आमच्यावर मुंबई तोडण्याचा आरोप होतोय, पण आम्ही जोडणारे आहोत," असेही एकनाथ शिंदेंनी नमूद केले.
मराठी माणसाच्या मुद्द्यावरून ठाकरेंना लक्ष्य
मराठी माणसासाठी काय केले असे म्हणत अनेकजण गळे काढतात, पण तो बाहेर का फेकला गेला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. "कोणाच्या काळात हे बाहेर गेले, पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? संक्रमण शिबिरात खुराड्यासारखं ठेवण्यात आलं ते मराठी माणसं नाही का?" असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
रमाबाई नगरमध्ये भाडे दिले जात नव्हते, तेव्हा आपण स्वतः चेक वाटल्याचे त्यांनी सांगितले. सर्व प्रकल्प 'जेव्ही'मध्ये करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. गिरणी कामगारांच्या संदर्भात बैठक झाली असून जास्त इन्सेटिव्ह देऊन त्यातून निर्माण होणारी घरे गिरणी कामगारांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 1 लाख लोकांचा सर्व्हे करून किती पात्र लोक आहेत याची नोंद केल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल
मुंबईबाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल, असे सांगत शिंदे यांनी क्लस्टरच्या माध्यमातून अनेक योजना आणत असल्याचे सांगितले. कोळीवाड्यांबाबतही निर्णय घेतला असून बदल घडवण्याचे काम सुरू आहे. धारावी हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प असून धारावीच्या विकासासाठी जमीन देत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या सरकारने केवळ पात्र लोकांसाठी निर्णय घेतला होता, पण आपण पात्र आणि अपात्र अशा दोन्ही लोकांसाठी निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या जागेत प्लॅन सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
"तुमच्या लोकांनी तिजोऱ्या धुतल्या!"
"मतदानाच्या आधी म्हणायचं मराठी मराठी आणि निवडून आल्यावर म्हणायचे कोण रे तू?" असे म्हणत शिंदेंनी नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होते आणि मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम केले, असे ते म्हणाले. "कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे आता भ्रष्टाचाराचा आरोप करतात. आम्ही तर रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या," असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून ठाकरेंना लक्ष्य केले.
पर्यावरण संरक्षण आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी योजना
पर्यावरणाचे संरक्षण आम्ही बोलून नाही तर करून दाखवतोय, असे शिंदे म्हणाले. पाणथळ आणि तिवरांची जंगले संरक्षित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फनेल झोनमुळे इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नाही आणि उंची वाढवता येत नाही, त्यामुळे टीडीआर देण्याचा विचार करत आहोत, हा टीडीआर विकून विकास करता येईल अशी माहिती शिंदेंनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी नवीन योजना आणल्याचेही त्यांनी सांगितले.
पालिकेचा एकही एचटीपी प्लॅन (Humanitarian Aid and Development Plan) नाही, असे म्हणत गेली 20 वर्षे 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' म्हणून काहींनी काम केले अशी टीका त्यांनी केली. आज सी-लिंकवर गेलो तर परदेशात गेल्याचा भास होतोय आणि गिरणी कामगारांबाबतही प्रयत्न करत असल्याचे एकनाथ शिंदेंनी नमूद केले.












Click it and Unblock the Notifications