मुख्यमंत्री शिंदे म्हणाले लाडका भाऊ योजनाही काढली! जाणून घेऊ नेमकी काय आहे योजना?
मुंबई - महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेवरुन चांगलाच गाजावाज सुरू आहे. बहिणीला योजना मग भावांनी काय केले? असा सवाल उपस्थित होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधिमडंळात लाडका भाऊ योजनेचा उल्लेख करीत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
महायुती सरकारने राज्यात लाडकी बहिण योजना आणली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रतिमहिना मिळणार आहे. तसेच त्यासाठी कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली असून कालावधी वाढवला आहे. एकीकडे लाडकी बहिण योजना आणल्याने राज्यातील भावांनी काय केले असा सवाल विरोधकांनी केला होता. त्यावर बराच खल झाला हा मुद्दाही विरोधकांनी बनवला होता.

सोशल मीडियावर मिम्स
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेनंतर सोशल मीडियावर या योजनेवरुन मिम्सही आले. विशेषतः भावांनी काय केले त्यांना योजना का नाही असे म्हणत काही युजर्सनी यावर चक्क गीतही तयार केले. ही गाणी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तसेच चांगलीच व्हायरलही झाली.
उद्धव ठाकरेंनी केली होती टीका
योजनेबद्दल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ही योजना काढली काही हरकत नाही पण घरातील बहिणींसाठी योजना काढायची आणि भावांना मात्र काहीच नाही अनेक भाऊ बेरोजगार आहेत. त्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करीत असून पक्ष जसे फोडले तसे घरही फोडत असल्याची कठोर टीकाही केली होती.
एकनाथ शिंदेंचे टीकेला प्रत्युत्तर
हा धागा पकडून काल विधिमंडळात अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. स्वतःच्या भावाला न्याय देता आला नाही. हे दुसऱ्यांच्या भावाला न्याय देऊ शकतील का? असा सवाल त्यांनी केला होता.
ही आहे लाडका भाऊ योजना
सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची माहिती दिली ते म्हणाले, "आम्ही लाडका भाऊ योजनाही काढली आहे. दहा हजारांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटनशिप महिन्याला देणार, डिप्लोमा होल्डरला ८ हजार आणि बेरोजरांगाना स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आहे."
महाराष्ट्रात खरंच लाडका भाऊ योजना आहे का?
महाराष्ट्रात प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित नाही. परंतु, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
काय आहे फायदा?
या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. परंतु, ही योजना फक्त राज्यातील केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नसून तरुणीही या योजनेस पात्र आहेत.












Click it and Unblock the Notifications