Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे नव्हे तर एकनाथ शिंदेचं आघाडीवर

मुंबई : 2010 साली शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर झाला. आदित्य ठाकरे यांचे राजकीय लॉन्चिंग देखील त्याच दसरा मेळाव्यात करण्यात आले."माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा," अशी आर्त विनंती बाळासाहेबांनी हात जोडून उपस्थित समस्त शिवसैनिकांना केली. त्यानंतर बाळासाहेबांचे निधन झाले, उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवली, युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली, मुख्यमंत्री पद भूषवले, शिवसेनेतली सर्वात मोठी बंडाळी सोसली.

आता उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.दरम्यानच्या काळात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. आता ते देखील स्वतःच्या हिमतीवर शिवसेना पुढे नेत आहेत. पण आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील शिवसेनेची तुलना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करणे आवश्यक आहे.

Uddhav Thackeray On Eknath Shinde

उद्धव ठाकरे यांनी कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर पक्षप्रमुख पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर भास्कर जाधव, नारायण राणे, राणे यांच्यासोबत अकरा आमदार, राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर अशा अनेकांनी शिवसेना सोडली. पण उद्धव ठाकरे यांच्या वर्मी घाव घातला तो एकनाथ शिंदे यांनी. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार आणि आठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर ठोकलेला दावा न्यायालय आणि निवडणूक आयोग तसेच विधिमंडळ अध्यक्षांच्या न्यायालयात देखील वैध ठरला. पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले.

उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठी गळती

लोकसभा निवडणुकीपर्यंत उद्धव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले असंख्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच तेरा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीत सात जागा जिंकून एकनाथ शिंदे यांनी आपला स्ट्राइक रेट दाखवून दिला.ज्या खासदारांची तिकिटे कापण्यात आली त्यातील काही खासदारांना विधान परिषदेवर संधी देऊन शिंदे यांनी त्यांचे पुनर्वसन केले.आणि जे खासदार रिंगणात होते त्यांच्या प्रचारासाठी शिंदे शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात होते. याउलट उद्धव ठाकरे यांची भिस्त मात्र शरद पवार आणि काँग्रेसच्या मतदारांवरच अधिक असल्याचे लोकसभा निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले.

शिंदे यांच्या शिवसेनेतून तुरळक आउटगोइंग

विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत सर्वच पक्षात आयाराम गयाराम राजकारणाला वेग आला आहे. आपल्या पक्षातून इतर पक्षात जाणाऱ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसेच संजय राऊत आणि अन्य पदाधिकारी वाईट भाषेत हिणवतात. गद्दार असा या नेत्यांचा सरसकट उल्लेख केला जातो.कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले जाते.पण याच विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची भिस्त अन्य पक्षातून त्यांच्या गटात दाखल झालेल्या उमेदवारावर सुद्धा आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले दीपेश म्हात्रे यांना सन्मानाने मातोश्रीवर पुन्हा प्रवेश देण्यात आला. तर 2005 साली राणेंबरोबर काँग्रेसमध्ये गेलेले राजन तेली यांनाही उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने पावन करून घेतले.2022 पासून उद्धव यांचे नेतृत्व झुगारून हजारो शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले पण एकनाथ शिंदे यांना सोडून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणाऱ्या नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची संख्या नगण्य इतकी आहे.लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रस्थापित उमेदवारांना निवडून आणू शकले पण एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन निवडून आणले हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.

उमेदवारी जाहीर करण्यातही शिंदे यांचीच सरशी

विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी केल्याचे दिसून आले. जे लोक आपल्या सोबत आले त्या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी देऊन टाकली आणि उद्धव ठाकरे यांच्या आधी आपले उमेदवार जाहीर केले. उद्धव ठाकरे यांना उमेदवार जाहीर करण्यात एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा जास्त वेळ लागला ही बाब संघटनेवर एकनाथ शिंदे यांची असलेली मांड स्पष्ट करते.

उद्धव यांचे बालेकिल्ल्यातील उमेदवार ठरेनात

शिवसेनेची जडणघडण मुंबई आणि ठाणे या शहरी पट्ट्यात सर्वाधिक झाली लालबाग लालबाग परळ शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवडी मतदारसंघात तर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे गटनेते अजय चौधरी प्रतिनिधित्व करीत आहेत. पण तरीही आपल्या बालेकिल्ल्यात उमेदवारांची निवड करताना उद्धव यांची चांगलीच दमछाक झाली आणि अखेरच्या क्षणापर्यंत शिवडीची उमेदवारी गुलदस्त्यात ठेवण्यात आली.

कोकणातही उद्धव यांची दिरंगाई

मुंबई पाठोपाठ शिवसेनेला सर्वाधिक प्रेम दिले ते कोकणाने. अगदी पनवेल पर्यंत बहुतेक सर्व मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून यायचे. एकनाथ शिंदे यांनी कोकणातील आपल्या सर्व मतदारसंघात उमेदवार जाहीर केले मात्र तिथेही उद्धव यांनी उमेदवारी जाहीर करण्यात वेळ घालवला. कोकणाच्या संघटनेवरही शिंदे यांचाच वरचष्मा असल्याचे इथे स्पष्ट झाले. बाळासाहेबांनी आपल्या मैदानी सभा घेऊन मराठवाडा दणाणून सोडला होता. तिथले उमेदवार सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या आधी एकनाथ शिंदे यांनी जाहीर करून उद्धव ठाकरे यांना मात दिल्याचे दिसून आले.

प्रचार करणार कोण आणि कधी ?

प्रत्यक्ष मतदानाला अजून 27 दिवस शिल्लक आहेत. पण आपल्या प्रत्येक उमेदवाराच्या मतदार संघात एकनाथ शिंदे यांची किमान एक फेरी पूर्ण झाली आहे. तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे अजूनही जागा वाटपाच्या गुऱ्हाळात रमले आहेत. निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता फक्त 25 दिवस उरले आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची समस्या उद्भवली आहे.

वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे यांना वाटतो तितका सोपा राहिलेला नाही त्यामुळे ते आपल्या मतदारसंघात गुंतून पडणार आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रभरात उभ्या केलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काय होणार, त्याच्यासाठी प्रचार सभा कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. उलट पक्षी कोपरी पाचपाखाडी या आपल्या घरच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी जवळपास 65 टक्के मतदान 2019 निवडणुकीत घेतले होते. त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची या परिसरावर प्रचंड पकड आहे.

जवळपास सर्व नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. शिवसेना आणि भाजप यांची युती घट्ट आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या मतदारसंघात फारसे गुंतून पडावे लागणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांचीच अधिक कोंडी होणार हे स्पष्ट दिसत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+