दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचे गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
अभिनेता सुशांत सिंग रजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशाच्या वडिलांनी या प्रकरणाचा पु्न्हा तपास करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, तर विरोधकांकडून हे राजकारण असल्याचं सांगितलं जातंय. आता याच प्रकरणावर भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर आदित्य ठाकरे यांनीही राणेंचे विषय खोडून काढत जोरदार प्रतिउत्तर दिलंय.

काय म्हणाले होते नारायण राणे?
दिशा सालियन प्रकरणावर आज भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मोठे गौप्यस्फोट केले. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा आपल्याला दोनदा फोन आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्यावर त्यावेळी मोठा दबाव होता. त्यांच्या घरी पेडणेकर ताई जायच्या. इतर लोकही जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता, असा आरोपही यावेळी राणे यांनी केला.
कसं दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर?
तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा फोन केल्याचा दावा आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत केला. त्यांच्या या खळबळजनक आरोपांना आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. आदित्य ठाकरे म्हणाले की, 'राणे यांना इतरांवर घाण आरोप करायचाच पगार मिळतो. त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही. माझ्या परिवारावर, माझ्या वडिलांवर, माझ्या पक्षावर, त्यांनी यापूर्वीही आरोप केले आहेत. त्यांना पक्ष सोडून किती वर्ष झाली मात्र त्यांच्या मनातून आम्ही काय उतरत नाही. बोलू द्या त्यांना. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात. पण कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
रस्ते घोटाळ्याचा पुनरुच्चार
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते घोटाळ्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, आज मी एक पत्र लिहिलं आहे. मी मुखमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मुंबईतील सगळ्याच आमदारांची आहे. 15 जानेवारी 2023 ला पत्रकार परिषद घेऊन मी ज्या घोटाळ्याला समोर आणलं होतं, त्याच्याची चर्चा आता सुरू आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications