मी सुशिक्षित नसले तरी संस्कारी आहे! लिलाबाईंच्या एका भाषणाने गुलाबरावांचा बालेकिल्ला ढासळला
Gulabrao Patil Vs Leelabai Chaudhari | राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. पण जेव्हा एखादी साधी, सुसंस्कृत महिला राजकारणातल्या 'मुलूखमैदानी तोफे'ला आपल्या शब्दांनी गारद करते, तेव्हा तो इतिहास ठरतो. धरणगाव नगरपालिकेच्या (Dharangao Municipal Election) निवडणुकीत असंच काहीसं थरारक नाट्य घडलंय. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे, आणि हा धक्का दिलाय एका अशा महिलेने ज्यांच्या केवळ एका भाषणामुळे संपूर्ण निवडणुकीचं वारं फिरलं.

'ट्रॅक्टर' विरुद्ध 'टेलर' त्या भाषणाची चर्चा
निवडणुकीचा प्रचार रंगात आला होता. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले मंत्री गुलाबराव पाटील सभेला संबोधित करत होते. आपल्या खास शैलीत त्यांनी विरोधकांना डिवचलं. "आमच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि समोरच्यांकडे फक्त टेलर आहे," असं विधान त्यांनी केल्याचे लिलाबाईंनी आपल्या भाषणातून सांगितलं आणि पुढे त्यांनी गुलाबरावांच्या या विधानाचा असा काही समाचार घेतला की निवडणुकीची दिशाचं बदलून गेली.
ती आली, तिने पाहिलं आणि अहिराणीत 'मैदान' मारलं!
लीलाबाई चौधरी. एक साधं पण करारी व्यक्तिमत्व. विरोधकांनी त्यांच्या शिक्षणावरून त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. पण म्हणतात ना, "संस्काराची शिदोरी शिक्षणाच्या पदवीपेक्षा मोठी असते." लीलाबाई व्यासपीठावर उभ्या राहिल्या आणि त्यांनी थेट अहिराणी भाषेत संवाद साधायला सुरुवात केली.
मायबोलीतल्या त्या शब्दांनी मतदारांच्या हृदयाला थेट हात घातला. त्या म्हणाल्या,
"मी सुशिक्षित नसले तरी संस्कारी आहे!"
या एका वाक्याने विरोधकांनी केलेल्या सर्व टीकेची हवाच काढून घेतली. ज्या सभ्यतेने आणि आक्रमकतेने त्यांनी पाटलांच्या 'ट्रॅक्टर' विधानाचा समाचार घेतला, ते बघून धरणगावची जनता भारावून गेली. सोशल मीडियावर हे भाषण एखाद्या वणव्यासारखं पसरलं आणि बघता बघता ही निवडणूक 'गुलाबराव विरुद्ध लीलाबाई' अशी झाली.
गुलाबराव पाटलांची निराशाजनक कामगिरी, जळगावात शिवेसनेत खांदेपालट शक्य?
जायंट किलरचा उदय
गुलाबराव पाटील म्हणजे हिंदी गाणी, शेरोशायरी आणि स्फोटक वक्तृत्व यांचा संगम. पण या निवडणुकीत त्यांच्या या 'मुलूखमैदानी तोफे'चे गोळे लीलाबाईंच्या साध्या पण प्रभावी शब्दांपुढे निकामी ठरले. ज्या चुरशीच्या लढतीत मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तिथे लीलाबाई चौधरी यांनी विजयाचा गुलाल उधळला.
धरणगावच्या नगरपालिकेत आता लीलाबाईंच्या शब्दांचा दबदबा असणार आहे. एका मंत्र्याला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धूळ चारणाऱ्या लीलाबाई चौधरी आता खऱ्या अर्थाने 'जायंट किलर' ठरल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications