धनंजय मुंडे अधिवेशनालाच आले नाहीत; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? महत्त्वाचं कारण आलं समोर
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन आजपासून शिर्डीत सुरु झालं. या अधिवेशनाला छगन भुजबळ व धनंजय मुंडे हे येणार का, हा प्रश्न विचारला जात होता. त्यावर अजित पवार गटाने हे दोन्ही नेते उपस्थित राहतील, असे सांगितले होते. मात्र आता छगन भुजबळ हे काही वेळासाठी अधिवेशनाला आले असले तरी, मंत्री धनंजय मुंडे मात्र अधिवेशनाला येणार नसल्याचं सांगितलं जातंय. ते का येणार नाहीत, याबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे.

मुंडे राहणार गैरहजर
शिर्डीतील अधिवेशनासाठी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नाहीत. काल राष्ट्रवादीकडून ते उपस्थित राहतील, असं सांगितलं गेलं होतं. मात्र आता त्यांच्या कार्यालयाकडून ते येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आजच्या शिबिराला येणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली. धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीत राहणार आहेत, असं त्यांच्या कार्यालयाने सांगितलं आहे.
मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी
राष्ट्रवादीचे नवसंकल्प अधिवेशन शिर्डीत होणार आहे. या अधिवेशनाच्या ठिकाणाला यशवंतराव चव्हाण नगरी म्हणून संबोधित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री, आजी माजी आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत ठिकठिकाणी बँनर आणि पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रवादीत चाललेय काय?
वाल्मिक कराडशी जवळीक, हार्वेस्टर घोटाळा, आवादा कंपनीच्या खंडणीची डील, पीक विमा घोटाळा यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर टिका होत आहे. त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. पक्षातील नेतेच त्यांना विरोध करु लागल्याने, धनंजय मुंडे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवारांनी मुंडे यांची पाठराखण केली असली तरी, पक्षातून होत असलेला विरोध मुंडे यांना आवडलेला नसल्याचे सांगण्यात येते.
मुंडेंना बाजूला केलंय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंडे यांना साईटला केल्याचं बोललं जात आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र अजित पवार आत्तापर्यंत मुंडे यांच्या पाठीशी ठाम राहिल्याचे दिसले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाही परंतु खंडणी प्रकरणात मंत्री मुंडे यांना एसआयटी व सीआयडीकडून चौकशीसाठी बोलवले जावू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मुंडे यांनी अधिवेशनाला दांडी मारली असावी, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications