हनीट्रॅप आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा खुलासा: नाशिकच्या तक्रारीची फडणवीसांकडून कबुली, पण...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. गेल्या दोन दिवसांपासून गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी तर थेट विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवल्याने मोठी खळबळ उडाली होती.

या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात स्पष्टीकरण दिले. हनीट्रॅप प्रकरणाशी संबंधित कोणतीही तक्रार आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. "ना हनी आहे, ना ट्रॅप आहे," असे सांगत मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपच्या सर्व आरोपांचे खंडन केले.
"कालपासून या सभागृहात हनीट्रॅपची सातत्याने चर्चा सुरू आहे. विरोधकांनी नेमके कोणते हनीट्रॅप येथे आणले हे मला समजत नाही. नानाभाऊंनी कोणता तरी 'बॉम्ब' आणल्याचे म्हटले होते, पण तो बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. तुमच्याकडे असा बॉम्ब असेल तर तो आमच्याकडे दिला पाहिजे ना?" असे फडणवीस म्हणाले. "कोणतीही घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. इथे आजी मंत्री आहे की माजी मंत्री आहे? हनीट्रॅपमध्ये कोण अडकले आहे? कोणत्याही आजी किंवा माजी मंत्र्याच्या हनीट्रॅपची तक्रार नाही, पुरावे नाहीत, आणि अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
'नाशिकची एक तक्रार होती, पण...'
"हनीट्रॅप संदर्भात एक तक्रार नाशिकमधून आली होती. एका महिलेने ती तक्रार केली होती, परंतु नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. ही तक्रार एका उपजिल्हाधिकाऱ्याशी संबंधित होती," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
"मला राजकारण करायचे नाही, पण तुम्ही सातत्याने ज्या व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करत आहात, ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे. तो काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असून निवडणुकीतही उभे राहिले आहेत," असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावर विरोधकांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, परंतु फडणवीसांनी आपले म्हणणे सुरूच ठेवले.
"नानाभाऊ, मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की, अशा प्रकारे सभागृहाचा वेळ वाया घालवणे, सभागृह सोडून जाणे, सभात्याग करणे योग्य नाही. नीट पुरावे आणा, जोरदारपणे मांडा आणि सत्ताधारी पक्षाची बोलती बंद करा. पण जे अस्तित्वातच नाही, ते बोलू नये," असे फडणवीस म्हणाले.
"विजय वडेट्टीवार यांना मी सांगतो, महाराष्ट्र याआधीही सुसंस्कृत होता आणि आजही आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. केवळ विष पेरणारे जे आहेत, त्यांना आवर घालण्याची आवश्यकता आहे. बाकी महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा कुठेही जात नाही," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नागपुरातील गुन्हेगारीत घट झाल्याची माहितीही सभागृहाला दिली. राज्यातील गुन्हेगारी ६ टक्क्यांनी तर नागपुरातील गुन्हेगारी ११ टक्क्यांनी कमी झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications